युको बँकेत चोरीची घटना उघड

रविवारी कारंजा येथील यशवंत मंडई येथील युको बँकेच्या मागील भिंतीला भगदाड पाडून आत घुसून दरोडेखोरांनी तीन संगणक, लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळवला.

नाशिक : रविवारी कारंजा येथील यशवंत मंडई येथील  युको बँकेच्या मागील भिंतीला भगदाड पाडून आत घुसून दरोडेखोरांनी तीन संगणक, लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळवला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांचा तिजोरी फोडण्याचा प्रयत्न मात्र फसला. सोमवारी सकाळी ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

 दरोडेखोरांनी बँकेच्या पाठीमागील भिंतीवरील एसी डक्ट फोडून आत घुसून सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची तोडफोड केली. वरच्या बाजूचा काचेचा दरवाजाही तोडला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. तसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले. बँकेचे व्यवस्थापक आकाश शहा यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी दिली.