पालघर जिल्ह्यात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळामध्ये बाप्पाचं आगमन

कोरोनाच्या सावटाखाली पालघर जिल्ह्यात घरोघरी दीड ,दोन आणि पाच दिवसांच्या तसचं सार्वजनिक मंडळामध्ये पाच , सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पाचं आज आगमन झालं आहे.

उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
पालघर : कोरोनाच्या सावटाखाली पालघर जिल्ह्यात घरोघरी दीड ,दोन आणि पाच दिवसांच्या तसचं सार्वजनिक मंडळामध्ये पाच , सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पाचं आज आगमन झालं आहे. त्याचं अनुषंगानं गणेशोत्सव आणि मोहरम हे सण शांततेत पार पडावेत यासाठी पालघर जिल्हा पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
पालघर जिल्ह्यात जवळपास १२६६ इतक्या सार्वजनिक तर ३९,९९४ इतक्या खाजगी गणपती मूर्तींची स्थापना झाली आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तासाठी २ अपर पोलीस अधीक्षक, ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, १०१ पोलीस अधिकारी, १२२६ पोलीस कर्मचारी, २ (SRPF) एसआरपीएफ चे प्लाटून आणि ५८५ होमगार्ड इतका फौजफाटा सर्वत्र तैनात करण्यात आला आहे. तर पोलीस मुख्यालयात जलद प्रतिसाद पथक आणि दंगल नियंत्रण पथक ठेवण्यात आलं आहे.
कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस ठाण्यात राखीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर लाठी, हेल्मेट, ढाल, अश्रूधुर या साधनांसह प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांना तयार ठेवण्यात आलाय. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर दंगा काबू योजना राबविण्यात येत असून गणेशोत्सव आणि मोहरम सणाच्या अनुषंगानं पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉर्नर मिटिंग आणि पायी गस्त करण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या रेकॉर्ड मध्ये असणारे गुन्हेगार तसचं अवैध धंदे करणाऱ्या वर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत असून त्यांच्या हालचालींवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत आहे.
तर सर्व नागरीकांना पोलीस दलाकडून आवाहन करण्यात आलं आहे की, सण साजरे करताना सामाजिक भान ठेवून आपली आणि इतरांची योग्य ती काळजी घेऊन सण सध्या पद्धतीनं साजरे करा. सण साजरा करताना ४ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या मनाई आदेशाचा भंग करून कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्या. तसचं जर कोणताही अनुचित प्रकार घडत असल्याचं निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचं आवाहन ही पालघर पोलीस दलाकडून करण्यात आलय.