एल.पी.कंपनीच्या मनमानी कारभाराविषयी भाजपाचे  आंदोलन

रायगड जिल्ह्यात रोहा, पेण, महाड, अलिबाग, पनवेल या तालुक्यात औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. येथील कंपन्यांमुळे या औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र अलिकडच्या कोरोना काळात धाटाव एमआयडीसीतील कमगारावर अन्यायचे प्रमाण खुपच वाढले आहे.

रोहा:  रायगड जिल्ह्यात रोहा, पेण, महाड, अलिबाग, पनवेल या तालुक्यात औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. येथील कंपन्यांमुळे  या औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र अलिकडच्या कोरोना काळात धाटाव एमआयडीसीतील कमगारावर अन्यायचे प्रमाण खुपच वाढले आहे. अश्यातच धाटाव गावातील स्थानिक एल.पी.कंपनीत काम करणारा  कामगार दिनेश शांताराम भोकटे याला कंपनी प्रशासनाने तडकाफडकी शुल्लक कारणावरुन काढून टाकले. महत्वाचे म्हणजे हा कामगार युनियन अध्यक्ष आहे. कोणतेही कारण नसताना कामगाराला काढून टाकल्याने आता रायगड जिल्ह्यातील भाजपा आक्रमक झाली आहे. एल.पी.कंपनीच्या मनमानी कारभाराविषयी भाजपा विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. प्रविण दरेकर व आ.रवि पाटिल  यांच्या प्रमुख उपस्थितीत एल.पी.कंपनी गेटसमोर कोरोना काळातील सर्व नियम पाळून बुधवारी १९ ऑगस्ट रोजी  आंदोलन करणार असल्याचे मत दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲड. महेश मोहिते यांनी केले. तसेच कामगार दिनेश भोकटे ला न्याय मिळवून देण्यावर भाजपा ठाम राहिल असेही त्यांनी सांगितले. या आंदोलनाद्वारे कंपन्यांचे कारनामे चव्हाट्यावर आणणार असल्याचे ॲड. महेश मोहिते म्हणाले.

              यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, समन्वय समिती संजय कोनकर, तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, शहर अध्यक्ष वसंत शेलार, राजेश डाके, कंपन्याचे कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  धाटाव एमआयडीसीतील प्रस्तापितांच्या राजकिय हस्तक्षेपामुळे या कामगाराला तडकाफडकी काढण्यात आल्याचे सर्वत्र कामगार वर्गातून बोलले जात आहे. धाटाव एमआयडीसीतील कामगारांवर अन्याय होणे आता नवीन नाही राहिले. मागील एक दोन वर्षात धाटाव मधील स्वाल्वे, दानाशमंद, युनिकेम, पेप्सी(वरुण), किसान या कंपन्यांनी मनमानी कारभार करुन कामगारांना रस्त्यावर आणल्याचे प्रकार घडले. त्याचप्रमाणे महिना भरूनही अर्धा  पगार देणे, कोरोंटाईन काळात सुट्ट्या भरुन न देता कमी पगार देणे अश्या विविध प्रश्नांनी कामगारांची पिळवणूक होत आहे. 

               एल.पी.कंपनी कामगार दिनेश भोकटे याला तडकाफडकी कामावरुन काढून टाकण्यात आले यासंबंधी विधान परिषद विरोधी पक्षनेते आ.प्रविण दरेकर यांच्या कानावर घातले.तसेच यासंबधी चर्चा करण्यासाठी ॲड. महेश  मोहिते स्वत: कंपनीचे मालक पी.पी.बारदेशकर यांच्याशी बोलले असता ते म्हणाले कि, यासंदर्भात आणखी पाच माणसे काढणार आहोत असे म्हणाले. तसेच मला कंपनी बंद करायची आहे. रोहा इंडसट्रिज असोसिएशन अध्यक्ष पी.पी.बारदेशकर यांच्या डोक्यात हे पिक कुणी रुजवले आहे. यामुळे कामगार बेघर होऊन कुटुंब उधवस्थ होतील. त्यामुळे बुधवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता विरोधी पक्षनेते आ.प्रविण दरेकर व आ.रविशेठ पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत कंपनीसमोर आंदोलन करणार आहोत असे असे ॲड. महेश मोहिते म्हणाले. 

               दिनेश भोकटे या एल. पी. कामगाराला तडकाफडकी काढण्यामध्ये राजकीय वरदहस्त असल्यास हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे. कामगारांमध्ये कुणीही राजकारण करुन त्यांच्या कुटुंबाला उधवस्थ करु नये अन्यथा भाजपा कामगाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून त्यांना न्याय देणार असल्याचे ते म्हणाले. आता येथील प्रस्थापीत नेते व कंपनीचे मालक पी.पी.बारदेशकर यांच्यावर विरोधी पक्षनेते आ.प्रविण दरेकर काय टिका करतात हे आंदोलनाच्या दिवशी पहावे लागणार आहे.