सिंधुदुर्गात गणपतीआधीच चाकरमान्यांना ७ दिवस क्वारंटाइन करणार?

सिंधुदुर्ग: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. तसेच राज्यातील मुंबई, ठाणे आणि पुणे अशा अनेक जिल्ह्यांतून चाकरमानी दरवर्षीप्रमाणे गणेशोस्तवासाठी कोकणात येतात. परंतु यंदा कोरोनाचा सावट असल्यामुळे आगामी गणेशोस्तव आणि मोहरम हे दोन सण शांततेत पार पडावे, यासाठी शुक्रवारी पालकमंत्री उदय सामंत मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने परजिल्ह्यातून सिंधुदुर्गात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कशाप्रकारे नियमावली असावी, यावर विविध चर्चा करण्यात आल्या.

केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार १४ दिवसांचा कालावधी राज्यात निश्चित करण्यात आला आहे. परंतु गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना यामध्ये सूट देण्यात यावी. तसेच १४ दिवसांच्या एवजी हा कालावधी ७ दिवसांचा करण्यात यावा. अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे करावी, असे मतप्रदर्शनही बैठकीत झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्वारंटाइन कालावधी ७ दिवसांचा करण्याची खास परवानगी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळवावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले. याशिवाय येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास सुलभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. येणाऱ्या चाकरमान्यांनी निघायच्या ४८ तास आधी कोरोना तपासणी करावी. यासाठी शासनाने मोफत अथवा एक हजार रुपयांत या चाचणीची व्यवस्था करावी, असे मुद्दे बैठकीत मांडण्यात आले आहेत.