चांदीच्या रूपात अवतरणार चिंचपोकळीचा चिंतामणी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गिरणगावातील चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यंदाच्या वर्षी मंडळाच्या देव्हार्‍यातील पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्ती ची विधिवत प्रतिष्ठापना करणार आहे. मंडळ यंदा १०१ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गिरणगावातील चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यंदाच्या वर्षी मंडळाच्या देव्हार्‍यातील पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्ती ची विधिवत प्रतिष्ठापना करणार आहे. मंडळ यंदा १०१ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
मंडळाने चिंतामणी चा पाटपूजन सोहळा ठरावीक पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत ठराविक अंतर ठेवून साधेपणाने करण्याचे ठरवले आहे.‌यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होईल. भव्य सजावट आणि रोषणाई वर खर्च न करता जमा होणाऱ्या वर्गणीतून शासकीय हॉस्पिटलला वैद्यकिय उपकरणे तसेच गरजूंकरिता रूग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वूमीवर मंडळाने या आधी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये एकूण १८८ रक्तदात्यांचे रक्त संकलित करण्यात आले. या शिबिरासाठी वाडिया रूग्णालय रक्तपेढी परळ यांचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले होते. तसेच मंडळाने कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रू. ३,५१,००० ची मदत केल्याची माहिती मंडळाचे खजिनदार श्री अतुल केरकर यांनी दिली आहे.
. यावर्षी मंडळाकडून कोरोना च्या काळात समाजात कोविड योद्धा ची भुमिका बजावलेल्या १०१ कोविड योद्धांचा सन्मान करण्यात येणार आहे.‌प्रशासनाकडून देण्यात येणा-या सर्व सुचनांचे पालन करूनच यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता पोलिस प्रशासना वर कसल्याही प्रकारचा अतिरिक्त ताण पडणार नाही याची मंडळाकडून दक्षता घेण्यात येईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात विभागीय वर्गणीदार यांच्या व्यतिरिक्त इतर भाविकांना मुखदर्शन घेता येणार नाही. उत्सव कालावधीत विभागीय वर्गणीदार यांना नियोजनानुसार ठराविक वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.परंतू चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन सर्व चिंतामणी भक्तांसाठी अॉनलाईन उपलब्ध असेल. त्यामुळे उत्सव काळात ईतर चिंतामणी भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन मंडळाचे मानद सचिव श्री.वासुदेव सावंत यांनी केले आहे.