यंदाच्या नवरात्रौत्सवावर कोरोनाचे सावट, शनिवारी घटस्थापना, झेंडूची फुले महागली

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी सर्वच सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. नवरात्रोत्सव देखील शासनाने लावून दिलेल्या अटींचे पालन करून साजरा केला जाणार असल्यामुळे गरबा, दांडिया कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत

महाड- शनिवारी देशभरात नवरात्रोत्सवाला ( navratri festival) सुरुवात होते आहे, शनिवारी घटस्थापना असली तरी यंदा इतर सणांप्रमाणे नवरात्रोत्सवावरही कोरोनाचे (coroma impact) सावट आहे. गेल्या दोन आठवड्यापासून कोरोना संक्रमणाची गती मंदावली असली तरीसुद्धा कोरोनाच्या सावटातच नवरात्रीची तयारी पूर्ण झाली आहे. हिवाळ्यात कोरोना संक्रमणाचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता असल्याने सरकार (maharashtra government)आणि प्रशासनाच्या पातळीवर खबरदारी बाळगण्यात येते आहे. सार्वजनिक दुर्गास्थापनांकरीताही यंदा गाईडलाईन आखून देण्यात ल्या आहेत. गरबा आणि दांडियांविनाच हा नवरात्रोत्सव साजरा करावा लागणार आहे.

पर्यावरण पूरक असावी मूर्ती :

यावर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळ करिता ४ फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फुटांच्या मर्यादित असावी यावर्षी शक्यतो पारंपरिक देवीच्या मूर्ती ऐवजी घरातील धातू अथवा संगमरवर आदि मूर्तीचे पूजन करावे.

आगमन व विसर्जन मिरवणुकीवर बंदी :

मूर्ती शाडूची पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीने विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे तसेच विसर्जनाच्या वेळी कोणतीही मिरवणूक काढू नये. पाच पेक्षा जास्त लोकांनी गर्दी करु नये. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे.

 आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम राबवावे :

आरोग्यविषयक शिबीरे(उदा.रक्तदान)आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

दांडिया विक्रीवर परिणाम :

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी सर्वच सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. नवरात्रोत्सव देखील शासनाने लावून दिलेल्या अटींचे पालन करून साजरा केला जाणार असल्यामुळे गरबा, दांडिया कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत याचा फटका दांडिया विक्रेत्यांना बसणार आहे.

 झेंडूची फुले दुपटीने महागली :

अतिवृष्टीमुळे बाजारात फुलांचा साठा कमी आला आहे त्यामुळे या नवरात्रोत्सवात झेंडूची फुले गेल्यावर्षीपेक्षा दुपटीने महागली आहेत. वाढत्या महागाईवर नाक मुरडत ग्राहकांनी काटकसर करत खरेदी केली. त्यामुळे फूल विक्रेत्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खरेदीत ४० टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.