रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर, ४७ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह

  • रत्नागिरी जिल्ह्यात अवघ्या एकाच दिवसात ४७ नव्या कोरोना रूग्णांची वाढ
  • रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ८ जुलैपर्यंत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे
  • रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वेगावे वाढत आहे. महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने कहर घातला आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यात अवघ्या एकाच दिवसात ४७ नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ६६१ इतकी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबणी, दापोली ग्रामीण रूग्णालय, कामथे आणि संगमेश्वर ग्रामीण रूग्णालय अशा ठिकाणी दहा ते बारा नवे रूग्ण आढळून आले आहेत. तसेच यामध्ये आठ कैदी, दोन पोलीस, एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी आणि एक खासगी डॉक्टरांचा देखील समावेश आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ८ जुलैपर्यंत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहेत. त्यामुळे गरज पडल्यास नागरिकांनी घराबाहेर जावे, अशी सूचना देखील जारी करण्यात आली आहे. सर्व प्रकारची दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहने बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांचा अनुभव लक्षात घेता, या ठिकाणी दोन पथके तैनात केली जाणार आहेत.