Cyclone hits government buildings in Mahad; Two crores required for repairs

महाड : गेल्या चार महिन्यांत राज्यात झालेला परतीचा पाऊस,  निसर्ग चक्रीवादळ यामध्ये महाड तालुक्यातील  ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या अनेक शासकीय इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पंचायत समिती महाड मधून प्राप्त झाली आहे. या सर्व इमारतींच्या दुरुस्तीकरिता सुमारे २ कोटी रुपयांची तातडीची गरज असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि सरकारला प्राथमिक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

कोरोनासह जून महिन्यातील निसर्ग चक्रीवादळ, मोसमाअखेरीस झालेला परतीचा पाऊस यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत इमारती, अंगणवाडी, स्मशान शेड,  शौचालय, बस स्टॉप, व्यायामशाळा,  समाजमंदिरे,  ग्रामपंचायतीच्या मालकीचे गाळे यांसह प्राथमिक शाळा,  माध्यमिक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

या संदर्भात पंचायत समिती बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायत विभागातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार  महाड तालुक्यातील १०१ प्राथमिक व माध्यमिक शाळा,  ३७ अंगणवाडी,  २९ ग्रामपंचायत कार्यालय, २७ स्मशानशेड्स, १६ समाजमंदिरे , ४ शौचालय, २ बस स्टॉप, ३  ग्रामपंचायत गाळे, १  व्यायामशाळा आदी इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंचायत समिती बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीअंती ही माहिती आढळून आली आहे.

या संबंधित शासकीय इमारतींच्या दुरुस्तीबाबतचा अहवाल पंचायत समिती ग्रामपंचायत विभाग महाड,  सह जिल्हा प्रशासन व शासनाकडे प्राथमिक स्तरावर पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.