निसर्ग वादळग्रस्तांना वाटप केलेल्या मदतीचा संपूर्ण अहवाल घोषित करण्याची मागणी

निसर्ग वादळाने (nisarg storm) रायगड जिल्ह्याला झोडपल्यानंतर वाटप झालेल्या शासकीय मदतीवर सर्वच तालुक्यातून आक्षेप घेतला जात आहे.

पनवेल : निसर्ग वादळाने (nisarg storm) रायगड जिल्ह्याला झोडपल्यानंतर वाटप झालेल्या शासकीय मदतीवर सर्वच तालुक्यातून आक्षेप घेतला जात आहे. नुकसानग्रस्तांना अद्यापही आर्थिक सहाय्य (Financial assistance) प्राप्त झाले नसल्याची चीड आणि ओरड असल्याने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी वाटप केलेल्या मदतीचा संपूर्ण अहवाल ( report of help)जनहितार्थ घोषित करावा, असे आवाहन पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी एका पत्राद्वारे केले आहे.

महाड येथील मानवनिर्मित इमारत दुघर्टनेतील मृतांच्या वारसांना शासनाने आर्थिक मदत केल्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सामाजिक संस्था आणि संवदेनशिल दात्यांना आवाहन करून मदतीचे हात पुढे करण्याचे आवहन केले आहे. याचा दुसरा अर्थ राज्य शासन त्यांचे पूनवर्सन आणि मदत करण्यास तो़कडे पडले आहे, असाही होतो. तरीही या आवाहनाबद्दल कडू यांनी जिल्हाधिकार्‍यांना धन्यवाद देत आधी राज्य सरकारकडून आलेल्या वादळग्रस्तांच्या मदतीबाबत पारदर्शकता दाखविण्याची विनंती केली आहे. तसे त्यांना लेखी पत्र पाठवून ट्विटही कडू यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल तसेच उपमुख्यमंत्र्यांनाही ट्विट केले आहे.
वादळानंतर कोकणासोबत रायगडचे फार मोठे आर्थिक आणि सामाजिक नुकसान झाले आहे. डबघाईस आलेल्या राज्य सरकारने काही शेकडो कोटींची मदतही रायगडात पाठविली असताना, प्रत्यक्षातील नुकसानग्रस्तांना त्याचे वाटप व्यवस्थित झाले नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हीच परिस्थिती असताना सरकारी यंत्रणेविरूद्ध आवाज उठवूनही अधिकारी मौन बाळगून आहेत. त्यांच्या गप्प राहण्याचे रहस्य सगळ्यांसमोर यावे आणि जिल्हा प्रशासनाचा पारदर्शक कारभार नागरिकांना अनुभवता यावा, याकरीता पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी वादळग्रस्त लाभार्थ्यांची यादी स्थानिक वर्तमानपत्रांतून घोषित करावी. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद नसेल तर कडू यांनी त्यांना पर्याय उपलब्ध करून देताना विनामुल्य त्यांच्या दैनिकात जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी दर्शविली आहे.