श्रीवर्धन तालुक्यात समाधान कारक पाऊस पडून सुद्धा पाटबंधारे प्रकल्प अपुर्ण असल्याने तालुका उन्हाळ्यात तहानलेलाच

श्रीवर्धन तालुक्यात समाधानकारक पाऊस पडून सुद्धा पाटबंधारे प्रकल्प अपुर्ण असल्यामुळे श्रीवर्धन तालुका उन्हाळ्यात तहानलेलाच राहत असल्याचे पाहायला मिळते. मागील वर्षी तर नेहमी पडणाऱ्या पावसाच्या दुप्पट पाउस श्रीवर्धन तालुक्यात पडला.

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात समाधानकारक पाऊस पडून सुद्धा पाटबंधारे प्रकल्प अपुर्ण असल्यामुळे श्रीवर्धन तालुका उन्हाळ्यात तहानलेलाच राहत असल्याचे पाहायला मिळते. मागील वर्षी तर नेहमी पडणाऱ्या पावसाच्या दुप्पट पाउस श्रीवर्धन तालुक्यात पडला. जवळ जवळ दोनशे इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद श्रीवर्धन तालुक्यात झाली. परंतु एप्रिल महिना उजाडल्या नंतर काही दुर्गम भागातील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. श्रीवर्धन तालुक्यातील वडशेतवावे व मारळ या ठिकाणी होत असलेल्या पाटबंधारे प्रकल्पांची कामे गेल्या अनेक वर्षापासून तशीच पडून आहेत. वडशेतवावे धरणाचे काम तर २००५ साली ८० टक्के पूर्ण झालेले आहे. केवळ २० टक्के भागाचाच बंधारा बाकी असून याठिकाणी असलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनींना मोबदला दिला गेला नसल्यामुळे प्रकल्प रखडल्याचे सांगण्यात येते.

वडशेतवावे पाटबंधारे प्रकल्प जर का पूर्ण झाला तर श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानवली तलावापर्यंत कालव्याने पाणी आणता येणे शक्य आहे व त्या ठिकाणी कालवा देखील खणून तयार आहे. रानवली धरणातील पाणी साठा कमी झाल्यानंतर वडशेतवावे धरणाचे पाणी श्रीवर्धन साठी उपलब्ध होऊ शकते. परंतु शासकीय अनास्था व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प गेल्या पंधरा वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. वडशेतवावे पाटबंधारे प्रकल्पाचा मुख्य जलस्त्रोत गाणी या गावापासून येणाऱ्या एका नैसर्गिक जलस्रोता पासून तयार झालेला आहे. उन्हाळ्यात देखील त्या जलस्रोता मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी असते.वडशेतवावे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाला तर श्रीवर्धन तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल व या ठिकाणच्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने शेती किंवा भाजीपाला पिकवता येईल. त्याचप्रमाणे हरिहरेश्वर जवळील मारळ या ठिकाणी देखील एक पाटबंधारे प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील काही प्रगतीशील शेतकरी या ठिकाणी सर्व प्रकारची भाजी उन्हाळ्यात देखील पिकवतात फक्त त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे. जर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना पाटबंधारे प्रकल्पा मुळे शेतात पाणी उपलब्ध झाले तर उन्हाळी भातशेती व भाजीपाला पिकवणे एकदम सोपी गोष्ट होऊन जाईल. आजमितीला संपूर्ण श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात भाजीपाला वाई किंवा पुणे येथील मार्केट यार्डातुन आणण्यात येतो. या ठिकाणच्या नागरिकांना ही भाजी दुप्पट भावाने विकत घ्यावी लागते. तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्प पूर्णत्वास आले तर या ठिकाणचा शेतकरी देखील सक्षम होईल व या ठिकाणच्या नागरिकांना देखील स्वस्त भावाने भाजी उपलब्ध होईल. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. परंतु येत्या काही दिवसात पर्यटन व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू होईल. मात्र हे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाले तर या ठिकाणच्या स्थानिक शेतकऱ्यांचा फायदा होईल. तसेच या ठिकाणच्या पर्यटन व्यावसायिकांना देखील रोजच्या रोज ताजी भाजी उपलब्ध होईल. तरी रायगडचे खासदार सुनील तटकरे व रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रखडलेले पाटबंधारे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.