मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद, जाणून घ्या कारण..

कोरोनाच्या या वाढत्या सावटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे प्रशासनाने आव्हान केले आहे असे असतानाही कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी जाण्यास बांधवांना प्रशासनाने मुभा दिली आहे. कोकणात जाणाऱ्या या चाकरमान्यांची संख्या सध्या जास्त दिसत आहे.

मुंबई : कोरोनाच्या या वाढत्या सावटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे प्रशासनाने आव्हान केले आहे असे असतानाही कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी जाण्यास बांधवांना प्रशासनाने मुभा दिली आहे. कोकणात जाणाऱ्या या चाकरमान्यांची संख्या सध्या जास्त दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना प्रवास करताना अडथळा निर्माण होऊ नये याकरिता मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. आजपासून दोन दिवस ही वाहतूक बंद राहणार आहे त्यानंतर १९ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट पुन्हा एकदा  ही वाहतूक बंद करण्यात येणार आहे. 

यामध्ये १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी घातली जाणार आहे. गणेशोत्सवात कोणताही अपघात होऊ नये म्हणून हा खबदारीचा उपाय करण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच त्यांनी अपघाताला सामोरे जाऊ नये याकरिता रत्नागिरी पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. याचबरोबर चाकरमान्यांच्या परतीच्या वेळी म्हणजेच १ सप्टेंबर ते २ सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात अत्यावश्यक आणि जीवनाश्यक वाहनांची वाहतूक चालू ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.