वांद्रे पश्चिम येथील मंडळाने साकारला लोकमान्य टिळकांचा चिखलीतील वाडा

कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून यावर्षी वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करण्याची २५ वर्षांची परंपरा अखंडित ठेवण्यात आली असून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव असलेल्या रत्नागिरी चिखली येथील वाड्याची हुबेहुब प्रतिकृती आरास म्हणून मंडळाने साकारली आहे. अत्यंत साधेपणाने पण गणेश उत्सवाची परंपरा अखंडित ठेवून हा उत्सव १२ दिवस साजरा करण्यात येणार आहे.

शासनाचे सर्व नियम पाळून साधेपणाने गणेशोत्सवाची परंपरा अखंडित ठेवणार – भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार
मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून यावर्षी वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करण्याची २५ वर्षांची परंपरा अखंडित ठेवण्यात आली असून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव असलेल्या रत्नागिरी चिखली येथील वाड्याची हुबेहुब प्रतिकृती आरास म्हणून मंडळाने साकारली आहे. अत्यंत साधेपणाने पण गणेश उत्सवाची परंपरा अखंडित ठेवून हा उत्सव १२ दिवस साजरा करण्यात येणार आहे.
भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या चोविस वर्षात पश्चिम उपनगरातील एक अग्रगण्य गणेशोत्सव मंडळ म्हणून नावलौकिक मिळवला आहे.दर वर्षी एका प्रसिद्ध मंदिराची हुबेहूब प्रतिकृती करण्यात येत असून ही आरास पाहण्यासाठी दरवर्षी गणेश भक्तांची मोठी गर्दी होते विशेष म्हणजे मुंबई, दिल्लीतील राजकीय नेते, फिल्म स्टार, खेळाडू असे बहुसंख्य सेलिब्रिटी या गणपती बाप्पा च्या दर्शनाला हजेरी लावत असल्यामुळे वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा मुंबईत दरवर्षी लक्षवेधी ठरतो.
दरवर्षी आम्ही एका मंदिराची प्रतिकृती साकारतो त्यात्या वर्षातील औचित्य साधून आतापर्यंत पंढरपची विठ्ठल मंदिर, मुंबईचे सिध्दीविनायक, जेजुरीचे खंडोबा, शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिरासह, गोव्याची शांतादुर्गा, नाशिकचे काळाराम मंदिर, तूळजापूरचे भवानी मातेचे मंदिर, ज्योतीबाचे मंदिर, गणपतीपुळयाचे गणपतीचे मंदिराची प्रतीकृती साकारण्यात आली होती. त्यानंतर देवगडमधील कुणकेश्वर, औरंगाबाद येथील भूवणेश्वर आणि कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिराच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या तसेच. दरवर्षी मंदिराच्या गाभा-यात त्यात्या दैवतांच्या मुर्तीही विराजमान करण्यात आल्या होत्या.
अशा अनेक मंदिराच्या प्रतिकृती आम्ही साकारल्या. यावर्षी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षे असल्याने लोकमान्य टिळक यांचा चिखलीचा वाडा साकारण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी सांगितले. यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर आँनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून प्रत्यक्ष दर्शन घेणाऱ्यांना आरोग्यासाठी सर्व नियम पाळण्यात येतील, गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन आम्ही हा उत्सव साजरा करणार असल्याचे जितेंद्र राऊत यांनी सांगितले. तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य शिबीर, सँनिटायझर, मास्क वाटप असे आरोग्याबाबत कार्यक्रम ही राबविण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान मंडळाचे संस्थापक आणि प्रमुख सल्लागार आमदार ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, आमचा हा गणेशोत्सव सर्व धर्मियांच्या एकतेचा प्रतिक आहे. सर्व धर्मिय कार्यकर्ते एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर आम्ही शासनाने घालून दिलेले नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. कारण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जनजागृतीच्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरेचा पाया रचला. त्यानंतर गेल्या शंभरहून अधिक वर्षे ही परंपरा अनंत अडचणींवर मात करुन अखंड सुरु आहे. ही अखंड परंपरा कायम ठेऊन आम्ही उत्सवात खंड पडू दिला नाही. मुंबईच्या अनेक मंडळानी अशाच पध्दतीने साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे ठरवले. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता यावा म्हणून आम्ही गतवर्षी एक मोठी लढाई न्यायालयात लढलो. त्यामुळे भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन आम्ही परंपरा कायम ठेवत आहोत. शेवटी गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, कोरोनाशी लढण्याचे बळ तो आम्हाला देईल, असेही आमदार ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.