चेन्नईच्या तरुणाचे मोनिका मोरेला हाताचे दान

मोनिका मोरे या तरुणीचा २०१४ साली घाटकोपर रेल्वे स्थानकात अपघात झाला होता. यात तिचे हात काढण्यात आले होते. या हाताचे प्रत्यारोपण आज ग्लोबल हॉस्पिटल मध्ये करण्यात आले.

पहिले हात प्रत्यारोपण मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये

मुंबई : मोनिका मोरे या तरुणीचा २०१४ साली घाटकोपर रेल्वे स्थानकात अपघात झाला होता. यात तिचे हात काढण्यात आले होते. या हाताचे प्रत्यारोपण आज ग्लोबल हॉस्पिटल मध्ये करण्यात आले. चेन्नई येथील ब्रेनडेड अवस्थेत गेलेल्या तरुणाचे हात त्याच्या कुटुंबीयांनी दान केल्याने हे शक्य झाले. गुरुवारी रात्री उशिरा चार्टर विमानाने हे हात मुंबईत आणण्यात आले. मोनिकाच्या कुटुंबियांना कळवून हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यास सूचित करण्यात आले होते.

मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातील प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरे हिच्या दोन्ही हातांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. चेन्नईच्या ग्लोबल रूग्णालयात ३२ वर्षीय तरूणाला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर कुटुंबियांच्या परवानगीनुसार त्याचे हात मोनिकाला बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. २७ ऑगस्टला रात्री उशीरा चार्टर्ड विमानाने ते हात मुंबईला आणण्यात आले. रात्री १.४० वाजेपर्यंत हे विमान मुंबईत उतरले आणि १५ मिनिटात ग्रीन कॉरिडोर करून ते ग्लोबल रूग्णालयात दाखल झाले. त्यानंतर लगेचच तिच्या हातांवर शस्त्रक्रियेला सुरूवात करण्यात आली.

ग्लोबल रूग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई यांच्या नेतृत्वाखाली १२ डॉक्टरांच्या टीमने मोनिकावर ही शस्त्रक्रिया केली आहे. यात प्लॉस्टिक सर्जन, मायक्रोव्हास्क्युलर आणि पुनर्रचनात्मक सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन आणि भुलतज्ज्ञ यांचा समावेश आहे. या शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला इटेन्सिव केअर युनिटमध्ये हलविण्यात आले आहे. हात दान करणारी कुटुंब, रूग्णालय, मुंबई व चेन्नई वाहतूक पोलिस आणि अवयवदानासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनचे आम्ही आभार मानू इच्छितो. कारण, वाहतूक पोलिसांच्या सहकार्य़ामुळे वेळेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली असेही प्रवक्ताने सांगितले.