प्रलंबित मागण्यांसाठी पालिकेच्या मार्ड डॉक्टरांनी घेतली महापौरांची भेट

पालिकेच्या प्रमुख केईएम, नायर आणि सायन या रुग्णालयातील मार्डच्या प्रतिनिधींनी बुधवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली असून महानगरपालिका संचालित वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यासंबंधी ही भेट घेण्यात आली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

मुंबई : पालिकेच्या प्रमुख केईएम, नायर आणि सायन या रुग्णालयातील मार्डच्या प्रतिनिधींनी बुधवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली असून महानगरपालिका संचालित वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यासंबंधी ही भेट घेण्यात आली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. डॉक्टरांच्या प्रलंबीत प्रश्नांवर सकारात्मकतेने मार्ग काढू असे आश्वासन महापौरांनी डॉक्टरांना दिले आहे. 

या मागण्यांसाठी डॉक्टरांनी घेतली भेट

वार्षिक शैक्षणिक शुल्क, वसतिगृहातील अपुऱ्या सुविधा यासह अनेक समस्या सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर महापौरांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे मार्ड अध्यक्ष डॉ. दिपक मुंढे यांनी दिली आहे.

कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून निवासी डॉक्टर कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. तर शैक्षणिक ऍक्टिव्हिटी बंद आहे. असे असताना निवासी डॉक्टरांना ८५ हजार रुपये शैक्षणिक शुल्क भरावे लागणार आहे. तेव्हा हे शुल्क माफ करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर पालिका रुग्णालयातील वसतिगृहात आवश्यक त्या सुविधांचा अभाव असल्याने निवासी डॉक्टरांची मोठी गैरसोय होते. त्यातच तृतीय वर्षाच्या, परीक्षा देणाऱ्या निवासी डॉक्टरांनी आद्यप खोल्या रिकाम्या केलेल्या नाहीत. तर परीक्षा होईपर्यंत अर्थात सप्टेंबरपर्यंत त्यांना खोल्या रिकाम्या करता येणार नाहीत. तेव्हा हा प्रश्न ही यावेळी मांडण्यात आला. 

महत्वाचे म्हणजे निवासी डॉक्टरांना अलगीकरण-विलगीकरणात रहावे लागते. अशावेळी त्यांना दिवसाला मिळणारा ३०० रुपयांचा भत्ता नाकारला जात आहे. यावर नाराजी दर्शवत हा प्रश्न ही निकाली काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महापौरांनी या समस्या सोडण्याचे आश्वासन यावेळी दिल्याचे डॉ. तांदळे यांनी सांगितले आहे.  यावेळी डॉ. मुंढे यांच्यासह नायर मार्डचे अध्यक्ष डॉ. सतिश तांदळे आणि सायन मार्डचे डॉ. अविनाश सकनूरे ही उपस्थित होते. 

पालिकेद्वारा विद्यावेतनासाठी वेंडर सिस्टम  असल्याकारणाने विद्यावेतन वेळेवर मिळणे अशक्य होत आहे. ज्यामुळे  रुग्णसेवा करणाऱ्या निवासी डॉक्टरांना अडचणीचा सामना करावा लागत आहे,  वार्षिक शैक्षणिक शुल्क आणि आकारण्यात येणारा आयकर आकारु नये ही प्रमुख मागणी आहे. 

डॉ. दीपक मुंढे,अध्यक्ष, केईएम मार्ड