Palghar fishermen found a flying fish ... does this fish really fly like a bird?

हे मासे तासाला ७० किमी.वेगाने उडू शकतात आणि पाण्याच्या पृष्ठभागापासून सुमारे ६ मी. उंच तरंगू शकतात.  शेपटीने पाण्यावर झटका देत तरंगण्यासाठी गती प्राप्त करतात. तर, पाण्यात परत शिरताना वक्षपर मिटले जातात.

पालघर : पालघरच्या मासेमाऱ्यांना उडणारा मासा सापडला आहे. संपूर्ण जिल्ह्यात या पाखरु माशाची चर्चा सुरु आहे.

मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या पालघरमधील मासेमारांना त्यांच्या जाळ्यात हा अनोखा मासा आढळून आला. हा मासा पाण्यात तर पोहतोच. मात्र, हा मासा पाण्याबाहेर उडतो देखील. पालघरच्या समुद्रात हा उडणारा मासा प्रथमच आढळून आला आहे.

पालघरमध्ये आढळून आलेल्या या ‘फ्लाईंग फिश’ माशाच्या जगभर ९ प्रजाती आणि ६४ जाती असून उष्ण प्रदेशातील समुद्रात हा मासा आढळून येतो. त्यांचे वक्षपर विस्तीर्ण व पडद्यांनी बनलेले असून ते पंखांप्रमाणे काम करतात. म्हणून तर या माशाला पाखरू मासा असंही म्हंटल जातं.

हा मासा त्याच्या बळकट शेपटीला रेटा देऊन पाण्याच्या पृष्ठभागावर उसळी मारून बाहेर झेप घेतो. आपल्या पखांच्या साहाय्याने काही अंतर तो हवेत तरंगत पार करु शकतो. असे असले तरी हा मासा पक्ष्यांप्रमाणे उडू शकत नाहीत. मात्र, हवेत तरंगत पुढे जाताना हा मासा उडत असल्याचा भास निर्माण होतो.

कोकण किनारपट्टीवर आढळणाऱ्या या पाखरू माशाचे शास्त्रीय नाव ‘एक्झॉसीटस व्होलिटॅन्स’ असे आहे. एक्झॉसीटिडी कुळातील माशांचे शरीर १५-४५ सेंमी लांब आणि दोन्ही टोकांना निमुळते असते. त्यांचे पृष्ठपर आणि गुदपर शेपटीच्या अगदी जवळ असतात. वक्षपर विस्तृत व पातळ पडद्यांचे बनलेले असतात. काळपट रंगाच्या या वक्षपरांवर काही जातींमध्ये ठळक काळे ठिपके असतात. शरीरावर मध्यम आकाराचे चमकते चंदेरी खवले असतात. या माशाचं तोंड वर वळलेले असते, त्याचे डोळे मोठे असतात आणि वाताशय मोठा असतो. अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागरात हे मासे प्रामुख्याने आढळतात. खोल समुद्रात असणारे हे मासे  क्वचितच किना-यावर पाहायला मिळतात.

हे मासे तासाला ७० किमी.वेगाने उडू शकतात आणि पाण्याच्या पृष्ठभागापासून सुमारे ६ मी. उंच तरंगू शकतात.  शेपटीने पाण्यावर झटका देत तरंगण्यासाठी गती प्राप्त करतात. तर, पाण्यात परत शिरताना वक्षपर मिटले जातात.