सुधागडवासियांची चिंता पुन्हा वाढली, सुधागड तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव

पाली : मागील आठवड्यात सुधागड तालुक्यातील ५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. त्यामुळे तालुक्यात एकही सक्रिय कोरोना रुग्ण नसल्याने सुधागडवासीय आनंदात होते. मात्र आज पालीतील देऊळवाडा येथील एक ६० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने सुधागडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे लोकांची चिंता पुन्हा वाढली आहे.

 या रुग्णाला व एकदम नजीक संपर्क आलेल्या लोकांना वावळोली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात येणार आहे. तसेच नातेवाईक व नजीकच्या संपर्कात आलेल्या ९ ते १० लोकांना होम कॉरेंटाईन करण्यात आले आहे. अशी माहिती सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली.  

सुधागड तालुक्यात कोरोनाचे एकूण ७ रुग्ण होते.  हे सर्व रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. मात्र आता पुन्हा एका रुग्णाची भर पडली आहे. याबरोबरच नागोठणे येथे राहणाऱ्या व सुधागड तालुक्यातील नांदगाव येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या महिलेलादेखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर रोहा येथे उपचार सुरू आहेत, असे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी सांगितले.