पालघर जिल्ह्यातील शुभम मदनेची उपजिल्हाधिकारी पदावर मजल, कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षेत मिळविले यश

वाडा: गणेश उत्सव मंडळामध्ये प्रश्न मंजुषेमधील सहभाग आणि शिकण्याची इच्छा या जोरावर पालघर जिल्ह्यातील जव्हार भागातील शुभम मदने याने स्पर्धा परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून उपजिल्हाधिकारी पदावर मजल

वाडा: गणेश उत्सव मंडळामध्ये प्रश्न मंजुषेमधील सहभाग आणि शिकण्याची इच्छा या जोरावर पालघर जिल्ह्यातील जव्हार भागातील शुभम मदने याने स्पर्धा परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून उपजिल्हाधिकारी पदावर मजल मारली आहे. लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला आणि आदिवासी भागातील हा तरुण उपजिल्हाधिकारी झाला. 

खरेतर शुभम यांचे वडील राजेंद्र मदने यांना स्पर्धा परीक्षेची एमपीएससी आणि युपीएसी काय असते माहिती नव्हते पण यातून मोठे अधिकारी तयार होतात इतकेच त्यांना माहीत होते.शुभमचे वडील राजेश यांचे शिक्षण जव्हारमध्ये सहावी सातवीपर्यंत झालेले.शुभम यांचे आजोबा यांच्या मृत्यूनंतर हे मदने कुटुंब जव्हार येथे स्थिरावले.मदने यांच्या कुटुंबाचा मुळ प्रवास हा मोखाडा, विक्रमगड आणि जव्हार असा प्रवास आहे.शुभमचे पणजोबा हे मोखाडा तालुक्यातील गोंदा  या गावच्या नांदगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक होते. शुभम यांच्या आई शिल्पा या दहावीपर्यंत शिकलेल्या आणि त्या ७० च्या दशकातील त्र्यंबक भाऊ मुकणे या माजी आमदार यांची नात असल्याची माहिती शुभमचे वडील राजेश देतात. आता शुभमचे वडील जव्हार बस आगारामध्ये मॅकेनिक आहेत.शुभम आणि त्याची बहीण असा परिवार आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत शुभमने जव्हार नगर परिषद शाळेत प्राथमिक शिक्षणानंतर जव्हार येथील के. व्ही.शाळेत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. इयत्ता दहावीमध्ये ९४ % गुण मिळविले. पदवी मुंबईच्या रुपारेल कॉलेजमध्ये घेतली आणि पुढील महत्वाच्या अर्थात स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी ते पुणे येथे गेले.  प्रथम प्रयत्नात ते स्पर्धा परीक्षा पास झाले आणि उपजिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली.आज शुभम यांना आयएएस व्हायचेय तेच स्वप्न त्यांचे त्यांच्या कुटंबियांचे आहे. आज त्यांचा जव्हार पंचायत समितीच्या दालनात सन्मान करण्यात आला. यावेळी जव्हार तहसीलदार संतोष शिंदे व गटविकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी याच तालुक्यात स्पर्धा परीक्षेत तहसीलदारपदी निवड झालेले कल्पेश जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.