श्रीवर्धनमधील गटारातला कचरा व लाकडाचे ओंडके उचलले न गेल्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार

श्रीवर्धन: श्रीवर्धन शहराला व तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिल्यानंतर अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष त्याचप्रमाणे नारळ, सुपारीची झाडे मोठ्या प्रमाणावरती पडली आहेत.  श्रीवर्धन नगर परिषदेने अतिरिक्त मजूर घेऊन तसेच ट्रॅक्‍टर घेऊन हा कचरा उचलायला सुरुवातदेखील केली आहे. परंतु शहरातील नागरिकांनी आता आपल्या वाड्या साफ करण्यास सुरुवात केली असून वाडीत असलेली नारळाच्या झाडाची पाने त्याचप्रमाणे पडलेल्या पोफळी टाकायच्या कुठे हा प्रश्न नागरिकांसमोर आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक आपल्या घराच्या बाहेर रस्त्यावरती अशाप्रकारे कचरा त्याचप्रमाणे झाडांचे ओंडके ठेवत आहेत.

झाडांचे ओंडके काही ठिकाणी गटारात पडले असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग देखील गटारात तसेच आहेत.श्रीवर्धन नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जरी अगोदर कचऱ्याचे ढीग उचलले असले तरी आता पुन्हा नागरिकांनी  टाकलेला कचरा उचलण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे, असे श्रीवर्धनचे माजी उपनगराध्यक्ष संतोष केळसकर यांनी नवराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तरी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने नागरिकांनी पुन्हा टाकलेला कचरा लवकरात लवकर उचलावा,अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.