चोरट्याकडून तीन लाख रुपये किंमतीच्या १४ दुचाकी जप्त; शाहूपुरी पोलिसांची कारवाई

    कोल्हापूर : शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून अट्टल चोरट्याकडून तीन लाख रुपये किंमतीच्या १४ मोटारसायकल जप्त केल्या. अजय बाळासो पटकारे (वय ३८, रा. विचारे माळ) हे मुख्य चोरट्याचे नाव असून, बाबासो रामचंद पाटील ( २५, रा. कुर, ता. भुदरगड), सौरभ राजू शिंदे ( २४, रा. खानापूर, ता. भुदरगड) अशी दोन साथीदारांची नावे आहेत.

    शहरात वाढत्या वाहन चोरीमुळे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार शाहूपुरी पोलिसांनी निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. शोध पथकातील पोलिस कॉन्स्टेबल सागर माने आणि शुभम संकपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत वाहन चोराची माहिती मिळवली. रेकॉर्डवरील चोरटा अजय पटकारे मार्केटयार्डात साथीदारांसह मोटारसायकल विक्रीसाठी येणार ही माहिती कळताच पोलिसांनी सापळा रचला. मार्केटयार्ड रेल्वे गोडाऊनजवळ अजय पटकारे विनानंबर प्लेटच्या मोटार सायकलवरुन आला. त्याचे सहकारी असलेले दादासो पाटील आणि सौरभ शिंदे वाट पाहत होते.

    पोलिसांनी पटकारे याच्याकडे विनानंबर प्लेटच्या मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यावर पटकारे याने विना नंबर प्लेटची मोटारसायकल शाहूपुरीतील जसवंत स्वीट मार्ट येथून चोरुन नेल्याची कबुली दिली. पोलिसांनी मोटार सायकल जप्त करुन तपास सुरू केला असता चोरलेल्या १४ मोटार सायकल हस्तगत केल्या.

    पटकारे याने मध्यवर्ती बस स्थानक, परीख पूल, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, धैर्यप्रसाद मंगल कार्यालय, आयटीआय येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.