कुरुंदवाड नगरपरिषदेस ३ कोटी व शिरोळ नगरपरिषदेस २ कोटींचा निधी मंजूर : राजेंद्र पाटील-यड्रावकर

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेस ३ कोटी तसेच शिरोळ नगरपरिषदेला २ कोटीचा निधी मंजूर झाला.

    जयसिंगपूर : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेस ३ कोटी तसेच शिरोळ नगरपरिषदेला २ कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विशेष कामांसाठी हा निधी वितरित केला असल्याचेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी म्हटले आहे.

    कुरुंदवाड व शिरोळ येथील पदाधिकारी यांनी यासंबंधी मागणी केली होती. त्याबाबत तात्काळ १२ ऑगस्ट रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कुरुंदवाड व शिरोळ या दोन्ही नगरपालिकांना नगरविकास विभागाकडून विकासकामांसाठी निधी उपलब्ध होऊन मिळावा अशी आग्रही मागणी केली होती.

    याबाबत आता शासन निर्णय झाला असून, नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत कुरुंदवाड व शिरोळ या दोन्ही नगरपालिकांसाठी पाच कोटीचा निधी मंजूर झाला असल्याचे यड्रावकर यांनी सांगितले.