शाहू महाराज यांच्याकडून आयसोलेशनला ५ लाखांचा जनरेटर

कोल्हापूर : कोल्हापूरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे नातू राजकुमार यशराजराजे छत्रपतीं यांच्या वाढदिवसानिमित्त आयसोलेशन येथे नव्याने स्थापन केलेल्या कोव्हीड केअर सेंटरसाठी ५ लाखाचा जनरेटर देण्याचे जाहिर केले.

माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांचे चिरंजिव राजकुमार यशराजराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा न करता त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसाठी १ हजार सॅनिटायझर बॉटल्स, १ हजार मास्क, ५०० फेसशिल्ड, २५० पीपीई किट आणि ५० गाऊन महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे आज सुपूर्द केले.

न्यू पॅलेस येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास श्रीमंत छत्रपती शाहु महाराज, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती, महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक अर्जुन माने, राजाराम गायकवाड, रत्नेश शिरोळकर, उदयोजक तेज घाटगे, प्रविण इंगळे, प्रविणसिंह घाटगे, आशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.
कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपायोजनासाठी शहरवासियांनी अधिकाधिक मदत करण्याचे महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी  यांनी केलेल्या आवाहनानुसार आज प्रत्यक्ष राजेघराण्यांनेही कोरोनाच्या उपाययोजनासाठी मदतीचा हात दिला.
– कोल्हापूरच्या राजे घराण्याने क्षणाचाही विचार न करता महापालिकेने केलेल्या आवाहनास त्वरीत प्रतिसाद देऊन तात्काळ ५ लाखाचा जनरेटर देण्याचे मान्य केल्याबददल महापौर निलोफर आजरेकर यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आभार मानले. राजे घराण्याने आपले राजेपन दातृत्वाच्या भूमिकेतून दाखवून दिल्याबददल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी कोल्हापूर शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्याबाबत महापालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणखीन काही मदत आवश्यक असल्यास तत्काळ उपलबध करुन देऊ, अशी ग्वाही दिली.