राजाराम बंधाऱ्याची पातळी वाढली तब्बल २२ फुटांनी; जिल्ह्यातील ५० बंधारे पाण्याखाली

    कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्यात मॉन्सूनचे दमदार आगमन झाले असून, गेले दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील ५० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या २४ तासांत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यांची पातळी तब्बल २२ फुटांनी वाढली आहे.

    जिल्ह्यात मंगळवारी पावसाचे दमदार आगमन झाले. बुधवार सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. रात्रभर पाऊस कोसळत होता. जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाचा जोर सतत कायम असल्यामुळे नदी आणि नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार शुक्रवारी सकाळी अकरापर्यंत नदीवरील ५० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

    यामध्ये पंचगंगा नदीवरील सात, भोगावती नदीवरील दोन, तुळशी, वारणा आणि कुंभी नदीवरील प्रत्येकी चार, दूधगंगा व कासारी नदीवरील प्रत्येकी एक, वेदगंगा नदीवरील आठ, हिरण्यकेशी नदीवरील सात आणि घटप्रभा नदीवरील सहा बंधारे पाण्याखाली आहेत. तर उर्वरीत अन्य बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात रस्ते खचले आहेत.