rajendra patil yadrawkar

    जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्या जमिनींचा पोत सुधारण्यासाठीच्या योजना वेगवेगळ्या पद्धतीने राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी क्षारपड जमीन सुधारणा योजनेसाठी अर्थसहाय्य देण्याबाबतची घोषणा केली होती. शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीची सद्यस्थिती, क्षारपड जमिनीचे असणारे एकूण क्षेत्र, आणि या जमिनींची सुधारणा करण्यासाठी येणारा खर्च याबाबतची विस्तृत अहवाल जलसंपदामंत्री पाटील यांना सादर केला होता.

    शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनींच्या अहवालाच्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील २७ गावांमधील क्षारपड जमिनीचे सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या रुपये ६० लाखांच्या निधीला शासन मान्यता मिळाली असून, लवकरच सर्वेक्षणाच्या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन सर्वेक्षणाचे काम प्रत्यक्ष सुरू होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.

    शिरोळ तालुक्यातील दानोळी, कोथळी, उमळवाड, अर्जुनवाड, उदगांव, घालवाड, हसुर, कवठेसार, शिरटी, शिरोळ, शेडशाळ, कवठेगुलंद, गौरवाड, कुरुंदवाड, टाकवडे शिरढोण, नांदणी, अब्दुललाट, तेरवाड, बुबनाळ, आलास, मजरेवाडी, बस्तवाड, हेरवाड, अकिवाट, दत्तवाड व दानवाड अशा २७ गावांमधील क्षारपड जमिनीचे सर्वेक्षण या योजनेअंतर्गत पूर्ण होणार आहे.

    सर्वेक्षण पूर्ण होताच क्षारपड जमीन सुधारणा योजनेसाठी अर्थसाह्य मिळावे, यासाठींच्या निकष पूर्ण करणाऱ्या प्रस्तावांना निधी मंजूर होण्यास राज्य शासनाकडून मदत होईल, असेही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.