महिलेचे तीन तोळ्याचे दागिने लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

    कागल : भाटनांगनूर (ता. निपाणी) येथे दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण असे सुमारे ३ तोळ्याचे दागिने हातोहात लंपास केले. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान चोरटे हे एका सीसीटीव्हीमध्ये आढळून आल्याने त्या दृष्टीने तपास सुरु आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अमृता अमित पाटील या गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आप्पाचीवाडी येथे आपल्या सासूसोबत देवदर्शनासाठी आल्या होत्या. देवदर्शन घेऊन त्या भाटनांगनूर येथे आपल्या घरानजीक आल्या असता पाठीमागून दबा धरुन आलेल्या दुचाकीवरील दोघांनी अतिशय चलाखीने अमृता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण असा सुमारे ३ तोळ्याचा अंदाजे दीड लाखाचा ऐवज लंपास केला. यावेळी अमृता यांनी आरडाओरडा केली. पण तोपर्यंत चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. मात्र, एका सीसीटीव्हीमध्ये त्यांची छबी कैद झाली आहे.

    दरम्यान, अमृता पाटील यांनी सदर घटनेची फिर्याद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून, या प्रकरणाचा तपास ग्रामीणचे फौजदार अनिल कुंभार करीत आहेत.