पन्हाळा तालुक्यात भीषण अपघात; टेम्पोची दुचाकीला धडक, दोघे गंभीर जखमी

    वारणानगर : वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा (जोतिबा) या गावच्या हद्दीत सरवळ नावाचे शेताजवळ भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने समोरून धडक देऊन दुचाकीस्वार सर्जेराव आनंदराव थोरात (रा.रेठरे हरणाक्ष ता.वाळवा जि. सांगली) व सुनिल महीपती गोडसे (रा.भवानीनगर बिचुद ता. वाळवा जि. सांगली) यांना गंभीर जखमी केले असून, दोघांवर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    टेम्पोचालक प्रकाश पांडुरंग कदम (रा. दाणेवाडी, ता पन्हाळा ) यांच्या विरोधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणेत आला आहे. याबाबतची फिर्याद दानेवाडीचे पोलीस पाटील बाळासाहेब यशवंत पाटील यांनी दिली आहे.

    याबाबत कोडोली पोलिसातून मिळालेली माहिती अशी, दुपारी तीनच्या सुमारास दाणेवाडी ते गिरोली रोडवर जोतिबा गावचे हदीत सरवळ नावाचे शेताजवळ टेंपोचे चालक प्रकाश हा भरधाव वेगाने चुकीच्या बाजूने येऊन दुचाकीवरून येणाऱ्या सर्जेराव व सुनिल यांना सामोरासमोर धडक दिली. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास सहाय्यक फौजदार शेडगे हे करीत आहेत.