kusti akhada kolhapur

देशभरात लॉकडाऊनमुळे(lockdown) गेल्या ८ महिन्यापासून बंद असणारे कुस्ती आखाडे शासनाच्या नियमानुसार आजपासून कुस्तीगिरांना सरावासाठी खुले करण्यात आले. कोल्हापुरातल्या मोतीबाग तालमीतही आजपासून कुस्तीचा आखाडा सुरु झाला.

कोल्हापूर: देशभरात लॉकडाऊनमुळे(lockdown) गेल्या ८ महिन्यापासून बंद असणारे कुस्ती आखाडे शासनाच्या नियमानुसार आजपासून कुस्तीगिरांना सरावासाठी खुले करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम(kolhapur talim) संघाच्या व्यवस्थापनाखाली असणारी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मोतीबाग तालमीत(motibag talim) आज शनिवारी पहाटे ६ वाजता हनुमानाच्या मूर्तीचे पूजन करून शास्त्रोक्त पद्धतीने उद-फुले घालुन आखाडा पूजन करण्यात आले.

गेल्या आठ महिन्यांपासून दबलेल्या तालमीतील तांबड्या मातीचे पैलवानाने उत्खनन करून जोर-बैठकांची मेहनत करत कुस्ती पकडीचा ही सराव केला.यावेळी पैलवानांच्या शड्डूने मोतीबाग तालमीच्या जाडजूड भिंती हादरून गेल्या. पैलवानांसाठी शासन नियमावलीचे पालन करून सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रामध्ये सराव घेतला जाणार आहे.

आजच्या कुस्ती सरावाच्या शुभारंभास तालीम व्यवस्थापन समितीचे अशोक पोवार, निलेश देसाई, अशोक माने, वस्ताद पै.उत्तम चव्हाण, पै. रामा कोवाड, पै.विजय पाटील, बाबुराव चव्हाण,जुनियर कुस्ती कोच सुहेल इत्यादी प्रमुख कुस्तीगीर मल्ल उपस्थित होते.