सकल मराठा आंदोलकांचे गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन

आंदोलनाला सुरुवात करताना सकल मराठा समाजाने दोन मागण्या केल्या आहेत.त्यापैकी एक मागणी, ज्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण स्थगिती मूळे झळ बसणार आहे,त्यांचे नुकसान होणार आहे त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी.आणि आरक्षण स्थगिती काळात राज्य सरकारने कोणतीही नोकर भरती करू नये अशी दुसरी मागणी होती.परंतु राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळून दोन दिवसांपूर्वी राज्यात तब्बल १२ हजार पोलिसांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय जाहीर केला.

कोल्हापूर –  मराठा आरक्षणाला (Maratha Reservation)  सर्वोच्च न्यायालयाने (SC) स्थगिती दिल्याने संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी आज कोल्हापूर  (Kolhapur)  जिल्हा दूध उत्पादक संघाच्या प्रवेश द्वारावर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजीमध्ये पुण्या मुंबईला जाणारे दूध वाहतूक करणारे टँकर रोखण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर संतप्त सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाची मशाल पुन्हा पेटवण्यात आली आहे.

आंदोलनाला सुरुवात करताना सकल मराठा समाजाने दोन मागण्या केल्या आहेत.त्यापैकी एक मागणी, ज्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण स्थगिती मूळे झळ बसणार आहे,त्यांचे नुकसान होणार आहे त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी.आणि आरक्षण स्थगिती काळात राज्य सरकारने कोणतीही नोकर भरती करू नये अशी दुसरी मागणी होती.परंतु राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळून दोन दिवसांपूर्वी राज्यात तब्बल १२ हजार पोलिसांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय जाहीर केला.त्यामुळे आधीच भडकलेल्या मराठा समाज आंदोलकांनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज गोकूळ दूध संघाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.आणि मुंबई पुण्या कडे जाणारे दुधाचे टँकर रोखण्याचा प्रयत्न केला.

मंगळवारपर्यंत राज्य सरकारने पोलीस भरतीला स्थगिती दिली नाही,तर बुधवारपासून राज्य सरकारचे दशक्रिया विधी करण्याचे आंदोलन सुरू करणार असल्याचे आंदोलक कार्यकर्ते सचिन तोडकर यांनी नवराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.तसेच यामध्ये काहीही बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास मराठा समाजाच्या वतीने इतिहासात नोंद होईल अशी आंदोलने केली जातील असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.