अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास १२ कोटींचा निधी मंजूर; राजेश क्षीरसागर यांची माहिती

महामंडळास आवश्यक उर्वरित ७५ टक्के निधी मंजूर होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याची माहितीही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

    कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजातील युवकांना इतर माध्यमातून न्याय मिळण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील उद्योजकांना सक्षम बनविण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

    या महामंडळाचे नियोजन विभागात विलिनीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर महामंडळाचे काम प्रगतीपथावर असून, महामंडळाकरिता सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित निधीपैकी रु. १२.५० कोटींचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

    ते पुढे म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला सन २०२१–२२ या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित रु. ५०.०० कोटी इतक्या तरतूदीपैकी २५ टक्के म्हणजेच रु. १२.५० कोटी इतका निधी करण्यास १ सप्टेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. सदर निधी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या मार्फत मंजूर करण्यात आला असून, या निधीच्या माध्यमातून सामाजिक सेवारील भांडवली खर्च, सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणुका, रोजगार व महामंडळाला भांडवली अंशदान या लेखाशिर्षाखाली खर्ची करण्याकरिता मंजूर करण्यात आला आहे.

    या निधीमुळे महामंडळाच्या कामास अधिक गती प्राप्त होणार असून, महामंडळास आवश्यक उर्वरित ७५ टक्के निधी मंजूर होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याची माहितीही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.