दोन दिवसांत माफी मागा अन्यथा राष्ट्रवादी जशास तसे उत्तर देणार; मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा

हसन मुश्रीफ यांनी यावेळी भाजपच्या मिडीया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांच्यावरही निशाणा साधला आहे. शरद पवारांवर अशा शब्दांत टीका करायला जिंदालला लाज नाही का वाटली? अशा शब्दांत हसन मुश्रीफ यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला. या प्रकरणावरुन राज्याचं राजकारण अजूनही तापत आहे. राजकीय नेत्यामध्ये अनेक आरोप – प्रत्यारोप होत आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर टिका केली आहे.

    मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह भाजपचे डार्लिंग झाले आहेत, अशी बोचरी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेले सचिन वाझे हे परमबीर सिंह यांचे जवळचे मित्र आहेत. संबंधित प्रकरणात परमबीर सिंह यांना माफीचा साक्षीदार बनवण्यात येणार होतं, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. हे प्रकरण आता अंगाशी येत असल्याचं पाहून देवेंद्र फडणवीस आता गप्प का आहेत? असा सवालही मुश्रीफांनी उपस्थित केला आहे.

    तसेच हसन मुश्रीफ यांनी यावेळी भाजपच्या मिडीया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांच्यावरही निशाणा साधला आहे. भाजपने याप्रकरणी लवकरात लवकर माफी मागावी, अन्यथा आमच्याकडूनही अशा प्रकारची वक्तव्य केली जातील. मग कुणाच्या पाठीतून आणि कुणाच्या डोक्यातून कळा येतात हे समजेल. शरद पवारांवर अशा शब्दांत टीका करायला जिंदालला लाज नाही का वाटली? अशा शब्दांत हसन मुश्रीफ यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. दोन दिवसांत माफी मागा अन्यथा राष्ट्रवादी जशास तसे उत्तर देणार, असा इशारा मुश्रीफ यांनी यावेळी दिला आहे.