शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसवण्यासाठी टास्क फोर्स नेमा; ‘आप’ची मागणी

    कोल्हापूर : कोरोना काळात शाळेचे इतर खर्च कमी झाल्याने शाळेच्या फी मध्ये ५० टक्के सवलत द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षणाधकारी किरण लोहार यांच्याकडे करण्यात आली होती. परंतु यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसवण्यासाठी ‘टास्क फोर्स’ नेमावी अशी मागणी आज ‘आप’ च्या वतीने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

    यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने तास घेतले जात आहेत. पण मागील वर्षाची फी न भरल्यामुळे ऑनलाइन वर्गात शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना लिंक पाठवून दिली जात नाही. कोरोनाकाळात शाळेचे इतर खर्च कमी झाले असूनही फी कमी केली जात नाही. शालेय फीचा तगादा लावून पालकांना वेठीस धरले जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या टास्क फोर्समध्ये गटशिक्षणाधिकरी, लेखापरीक्षक व दोन पालक प्रतिनिधी असावेत. याच्या माध्यमातून प्रत्येक शाळेच्या फी चे ऑडिट करून त्यांनी आकारलेली फी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करते का? याची तपासणी करून आपल्या कार्यालयाकडे अहवाल सादर करावा. तसेच ज्या शाळा या ऑडिटमध्ये सदोष आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी.

    सर्व शाळांनी आपल्या मागील वर्षीच्या खर्चाचे ऑडिट करून अतिरिक्त जमा रकमेचा परतावा पालकांना करावा, असे आदेश शिक्षण विभागाने द्यावेत. शालेय वर्षाचा कार्यकाळ व अभ्यासक्रम ठरल्यानंतरच पालक-शिक्षक कार्यकारी समिती तयार करून त्यांची मान्यता घेतल्यावरच नवीन शालेय वर्षाची फी आकारावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. फी तपासणीसाठी सोमवारपर्यंत टास्कफोर्स नेमण्यात येईल, असं शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी शिष्टमंडळास दिले. यावेळी आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाईं, युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, शहर युवाध्यक्ष मोईन मोकाशी, राज कोरगावकर, दिलीप पाटील, विजय हेगडे, विजय भोसले, बसवराज हदीमनी आदी उपस्थित होते.