‘स्वाभिमानी’च्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनाचा प्रयत्न

२०२१ जुलै-ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने शेत पिकाचे मोठे नुकसान झाले होते. अनेक दिवसांपासून नुकसानभरपाईची भरघोस किंमत मिळावी म्हणून स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

    कुरुंदवाड : शासनाने शिरोळ तालुक्यात महापुराने बाधित झालेल्या पिकास प्रतिगुंठा १३५ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश केल्याने त्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाविकास आघाडी शासनाच्या (Mahavikas Aghadi Government) प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

    २०२१ जुलै-ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने शेत पिकाचे मोठे नुकसान झाले होते. अनेक दिवसांपासून नुकसानभरपाईची भरघोस किंमत मिळावी म्हणून स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काल शासनाने पूरबाधित क्षेत्रातील पिकाच्या नुकसानीसह प्रतिगुंठा १३५ रुपये जाहीर केल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले.

    आज दुपारी साडेचारच्या सुमारास मारुती चौकात नगरपालिकेसमोर स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमून शासनाच्या निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. त्यातच एका कार्यकर्त्यांने शासनाच्या प्रतिकात्मक पुतळा घेऊन त्याला पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पाेलिस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू झाली. या झटापटीमध्ये अर्धा पुतळा पोलिसांच्या हातात तर अर्धा पुतळा कार्यकर्त्यांच्या हातामध्ये राहिला. कार्यकर्त्यांनी अर्धा पुतळ्याचे दहन केले व आपला निषेध व्यक्त केला.

    या निषेध आंदोलनामध्ये आण्णासो चौगुले, युवा कार्यकर्ते रघु नाईक, युवा आघाडीचे अध्यक्ष बंडू पाटील, कडोले बंडू उंमडाळे, विश्वास बालिघाटे, योगेश जीवाजे, अविनाश गुंदले, पिंटो आरवाडे, आभिजीत पाटील, चेतन हिरेमट, महावीर आंबाडे, सुरेश चौगुले, राजु पाटील इत्यादी कार्यकर्ते सामील झाले होते.