बाळुमामाभक्तांनी सावध राहण्याचे आवाहन

  मुरगूड : महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर, ता. भुदरगड येथील सदगुरु बाळूमामा देवस्थान यांच्याशी मनोहर भोसले यांचा काही संबंध नाही. बाळू मामा यांचे अनुयायी भोंदूगिरी करून कोणाला फसवत नाहीत, अशा स्वयंघोषित ढोंगी साधूपासून बाळू मामांच्या भक्तगणांनी सावध राहावे असा इशारा बाळू मामा देवस्थान समितीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.

  “सदगुरू बाळूमामा हे एक आधुनिक युगातील संत आहेत.आपले संपूर्ण आयुष्यभर त्यांनी भाकड भोंदूगिरी व अंधश्रध्देच्या विरोधात सर्वसामान्य लोकांमध्ये जाणीव जागृती केली. माणसांना अंधश्रध्देच्या जोखडातुन मुक्त करण्याचे काम त्यांनी केले. मुक्या प्राण्यांची सेवा करून त्यांनी समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. मुक्या प्राण्यांची सेवा करा असा संदेश त्यांनी कृतितुन दिला आहे. बाळूमामांची किर्ती सध्या जगभर पसरत आहे. अशातच काही ढोंगी भोंदूबाबा बाळूमामांच्या नावावर अंधश्रध्दा पसरविण्याचे काम करीत आहेत. यापैकी मनोहर भोसले रा. उंदरगाव, ता. करमळा हे एक असुन ते ढोंगी व लबाड आहेत. बाळूमामांबद्दल तो जे काही सांगतो ते खोटे आहे. त्याचा आणि बाळूमामा देवालय आदमापूर याची काहीही संबंध नाही. जो बाळूमामांचा भक्त असतो तो भक्तांना कधीच फसवत नाही,” असे मत बाळूमामा देवालय समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, अध्यक्ष धैर्यशील भोसले व सेक्रेटरी रावसाहेब कोणकेरी यांनी व्यक्त केले.

  १९६६ साली बाळूमामांनी आदमापूर येथे आपला देह ठेवला. त्यांनी आदमापूर वासियांसह भक्तगणावर मोठी कृपा ठेवली. सध्या बाळूमामांची २२ हजार बकरी आहेत. महाराष्ट्र कर्नाटकात १६ (सोळा) ठिकाणी ती बग्गाच्या माध्यमातुन मजल दर मजल करीत बाळूमामांचा महिमा भक्तांना सांगण्याचे एक प्रकारचे काम करत आहेत. काही भक्त भक्तिभावाने, काहीजण मानधन तत्वावर त्यांची राखण करत आहेत. भक्तांची बाळूमामांवर श्रध्दा वाढत आहे. यामुळे आदमापूर हे ठिकाण अल्पावधीतच बाळूमामांमुळे जगात प्रसिध्द होत आहे. देश-परदेशातील पर्यटक ही या धार्मिक स्थळी येतात आणि मामांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत असतात. बाळूमामांची ख्याती वाढत असतानाच अलिकडच्या काळात बाळूमामांची बकरी जशी पुढे-पुढे जात आहेत. तसे काही ढोंगी साधु दृष्ट व स्वार्थी हेतूने उत्सव साजरे करत आहेत.

  भक्तांना खोट्या-नाट्या गोष्टी सांगून बाळूमामांचा भंडारा देऊन आपला आर्थिक फायदा करून घेत आहेत. अशा भंडारा देणाऱ्या व बाळूमामांच्या भक्ताची लुट करणाऱ्या तांत्रीक मांत्रीक ढोंगी बाबापासून सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.
  समितीकडुन अशा कोणत्याही कृतीचे समर्थन केले जात नसुन बाळूमामांच्या नावाने भंडारा देणाऱ्या बुवांपासून सावध राहा असा इशारा दिला आहे.

  बाळूमामांचे बकऱ्यांचे कळप ज्या ठिकाणी आहेत, त्याठिकाणी आणि आदमापूर येथील मंदिरात असणाऱ्या दानपेटी मध्येच भक्त भरभरून देणगी देतात. आदमापूर येथील बाळूमामा मंदिरा मध्येच देणगीची पावतीअधिकृत दिली जाते. अन्यत्र कुठेही अशा पावत्या दिल्या जात नाहीत याची भक्तांनी नोंद घ्यावी. अन्यत्र बाळूमामांचे नावावर जर कोण तुमच्याकडे पैसे मागत असेल तर आपण देवु नयेत. अशा आर्थिक नुकसानीस बाळूमामा देवालय समिती जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

  बाळूमामांचा अवतार, वंशज कोणीही नाही जर कोण भासवत असेल तर ते साफ चुकीचे आहे. बाळूमामांचा भक्तगण हाच बाळूमामांचा प्रपंच आहे. भक्तांनी बाळुमामांच्या नावावर लुट करणाऱ्या लोकांपासुन सावध राहावे. कोणत्याही प्रकाराचा आर्थिक व्यवहार करू नये. जर अशा फसवणुकीच्या घटना घडत असतील तर आपण जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करून माहिती द्यावी व भोंदू बाबाचे पितळ उघडे पाडण्यासंदर्भात सहकार्य करावे.

  आजपर्यंत बाळूमामा देवालयाकडुन पंढरीच्या वारीसाठी दिंडी नेण्यासाठी ५ ते ६ पत्र देण्यात आलेली आहेत. त्या पैकी एक पत्र मनोहर भोसले याला देण्यात आलेले आहे. त्याचा गैरअर्थ त्याने काढु नये असेही सांगितले यावेळी विश्वस्त गोविंद दत्तु पाटील, शिवाजी लक्ष्मण मोरे, सरपंच विजय गुरव, ग्रामपंचायत आदमापूर सदस्य प्रकाश कापरे, व्यवस्थापक अशोक पाटील व पोलीस पाटील लक्ष्मण पाटील, राजाभाऊ माळी, लक्ष्मणराव चिंगळे हे उपस्थित होते.