गणेशोत्सवानिमित्त सहा गावात महारक्तदान शिबिर

    हुपरी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात धुमाकूळ घातला होता. आगामी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हुपरी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या ‘अभिनव’ संकल्पनेतून गणेशोत्सवानिमित्त परिसरातील सहा गावात महारक्तदान शिबिर आयोजित करुन अनोखी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सदरचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.

    सध्या गणेशोत्सव साजरा करताना कोरोनाचे सावट असल्याने अनेक अडचणी येत आहेत. मोठ्या उत्साहात साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळानी अनेक वाद्यांना फाटा देत साध्या पद्धतीने गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तांचा तुटवडा भासत असल्याने पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावासाठी महारक्तदान शिबिर आयोजित केले आहे. याचा शुभारंभ इंगळी गावातून आज करण्यात आला. यावेळी इंगळी गावातील महिला वर्गासह सर्वानी भरभरून प्रतिसाद देत शंभरभर जणांनी रक्तदान केले.

    या शिबिराला हुपरी परिसरातील अनेक गणेशोत्सव मंडळांकडून प्रतिसाद मिळत असून मंगळवारी विठ्ठल मंदिर पट्टणकोडोली, बुधवारी विठ्ठल मंदिर रेंदाळ, बिरदेव मंदिर तळंदगे यासह समारोप हुपरी येथील यशवंत मंगल कार्यालयात होणार आहे. पाच चालणाऱ्या या महारक्तदान शिबिरात दोन हजार रक्तांचे संकल्प असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी सांगितले.