घरफोडीतील दाेघे जेरबंद; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चार लाखांचा माल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शाहू नाका येथे सापळा रचून कारवाई करत घरफोडी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.

    कोल्हापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शाहू नाका येथे सापळा रचून कारवाई करत घरफोडी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक चार चाकी वाहन आणि चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे चार लाख नव्वद हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    दागिने विकण्याच्या तयारीत हाेते

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना घरफोडीतील दोन आरोपी चोरीचे दागिने विकण्यासाठी शाहू नाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शाहू नाका परिसरात सापळा रचून घरफोडीत चोरीचे दागिने विक्रीसाठी आलेल्या दोघा जणांना ताब्यात घेतले.

    राजेंद्र बाबर आणि राजकुमार विभुते अशी या दोघांची नावे आहेत. चाेरट्यांकडून पोलिसांनी एक चार चाकी वाहन आणि चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे चार लाख नव्वद हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, अमोल कोळेकर, नितीन चोथे, सागर कांडगाव, अजय वाडेकर, ओमकार परब, अजय काळे आणि सहकाऱ्यांनी मिळून केली.