जेवणाचा दर्जा ढासळला तर थेट मला फोन करा; हसन मुश्रीफ यांचे कामगारांना आवाहन

  जयसिंगपूर : बांधकाम कामगारांना दुपारचे व रात्रीचे मोफत भोजन मिळावे ही महाविकास आघाडी सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या जेवणाचा दर्जा ढासळला अथवा जेवण वेळेत न मिळाल्यास थेट मला फोन करा, असे आवाहन कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कामगारांना केले. बांधकाम व इतर कामगारांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. ती करून मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ते जयसिंगपूर येथील बांधकाम कामगारांना मोफत जेवण वितरण कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर (Dr. Rajendra Pati) होते.

  यावेळी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, काबाडकष्ट करणाऱ्या कामगार वर्गाला पौष्टिक व दर्जेदार अन्न मिळावे, या भावनेतून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही अभिनव योजना सुरू केली आहे. इमारत बांधकाम व इतर कामगार मंडळाच्या माध्यमातून कामगारांसह त्याच्या कुटुंबीयांचही कोट-कल्याण करणाऱ्या योजना या मंडळामार्फत राबविल्या जात आहेत.

  यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, प्रांताधिकारी विकास खरात, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, आयटकचे दिलीप पवार ,आनंदा गुरव, भारतीय मजदूर संघाचे अभिजीत केकरे, मनसेचे संघटक राजू निकम, आर्किटेक्ट इंजीनियर असोशियनचे अध्यक्ष राजू देसाई, उपाध्यक्ष रवींद्र चौगुले, नितीन पाटील, मिश्रीलाल जाजू, रघुनाथ देशिंगे, शामराव कुलकर्णी आदी प्रमुख उपस्थित होते.

  लवकरच शेतमजुरांचेही कल्याणकारी मंडळ

  मुश्रीफ म्हणाले, जनतेने मला जी -जी संधी दिली, तीचे जनतेसाठी सोनं करण्यात मी यशस्वी झालो. शेतमजुरांसह रिक्षा, ट्रॅक्स, टेम्पो व ट्रक ड्रायव्हर यांचेही महामंडळ लवकरच स्थापन करणार आहोत, असे त्यांनी घोषित केले.

  आधी मुश्रीफांचा सत्कार करा : यड्रावकर

  या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्वमालकीची जागा दिल्याबद्दल राज्यमंत्री यड्रावकर यांचा सत्कार आर्किटेक्ट्स व इंजिनिअर असोसिएशन यांच्यावतीने होणार असल्याचे निवेदकाने जाहीर केले. त्यावेळी तो नम्रपणे नाकारत कॅबिनेट मंत्रिमंडळाने या स्मारकाला मंजुरी दिली, त्या त्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार आधी व्हायला पाहिजे, असा आग्रह धरीत यड्रावकर यांनी मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार आधी केला.