एका पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का?; हसन मुश्रीफांचा सवाल

हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. ही सोची समझी चाल आहे हे मी आधीच सांगितलं होतं. एका पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? असा सवाल करतानाच हे अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचं कारस्थान असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला.

  कोल्हापूर: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापे मारण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली आहे. देशमुखांवरील कारवाई ही सोची समझी चाल आहे. याप्रकरणी लवकरच दूध का दूध आणि पानी का पानी होईलच, असं हसम मुश्रीफ यांनी सांगितलं.

  हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. ही सोची समझी चाल आहे हे मी आधीच सांगितलं होतं. एका पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? असा सवाल करतानाच हे अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचं कारस्थान असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला.

  देशमुख निर्दोष बाहेर येतील

  माझ्यासह अन्य नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली होती. त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. केवळ मानसिक त्रास देऊन बदनाम करण्याचा हा प्रकार होता. तोच प्रकार देशमुखांच्या बाबतीत होत आहे. त्यामुळे लवकरच दूध का दूध, पानी का पानी होईल आणि देशमुख या प्रकरणातून निर्दोष बाहेर पडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  देशमुखांविरोधात एफआयआर दाखल

  100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.