एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांसाठी लॉकडाऊन काळातील विजेचा किमान आकार रद्द करा,चंद्रकांत पाटील यांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

लॉकडाऊनमुळे(Lockdown)कोल्हापूरमधील(kolhapur) पंचतारांकित कागल, गोकुळ शिरगांव तसेच शिरोली MIDC १६ मे पासून २३ मे पर्यंत पुर्णपणे बंद आहेत. या कालावधीत उच्चदाब वीज ग्राहकांना(Electricity) याचा फारच तोटा सहन करावा लागणार आहे

    कोल्हापूर : कोल्हापूरच्या MIDC क्षेत्रातील उद्योजकांना लॉकडाऊन काळातील विजेचा किमान आकार रद्द करा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील(Chandrakant patil demand to power minister) यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली आहे.

    संपूर्ण देश आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे.गेली दीड वर्षे अशा संकट काळामध्ये संपुर्ण अर्थव्यवस्था कोलमड़ली असून सर्वच क्षेत्राला याची झळ पोचली आहे. कोल्हापूर जिल्ह्याची सध्याची परिस्थिती पाहता हा जिल्हा कोरोनाचे देशातील सर्वाधिक रुग्ण असलेला जिल्हा बनला आहे.या गंभीर प्रसंगी प्रशासनाच्या वतीने लॉकडाउनचे निर्बंध कडक केले आहेत. लॉकडाऊनचे निर्बंध लावताना MIDC क्षेत्राचा या बंद काळातील होणाऱ्या नुकसानीचा विचार प्रशासनाच्यावतीने केला गेला नाही, असे त्यांनी ऊर्जामंत्र्यांना कळवले आहे.

    आज लॉकडाऊनमुळे कोल्हापूरमधील पंचतारांकित कागल, गोकुळ शिरगांव तसेच शिरोली MIDC १६ मे पासून २३ मे पर्यंत पुर्णपणे बंद आहेत. या कालावधीत उच्चदाब वीज ग्राहकांना याचा फारच तोटा सहन करावा लागणार आहे. कारण किमान आकार हा ४११ प्रति केव्हीए प्रति महिना असा असतो. उदाहरणार्थ २०००केव्हीएसाठी  ८,२२,०००फिक्स चार्ज आहे. याचा अर्थ ८ ते १० दिवस कारखाने बंद ठेवून पुर्ण २६ दिवसासाठी किमान आकार भरावा लागणार आहे.

    त्यामुळे वरील बाबीसाठी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या ऊर्जामंत्र्यांना ईमेल पाठवला आहे. या ईमेलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील MIDC क्षेत्रातील उद्योजक वीज ग्राहकांच्या वतीने मागणी करण्यात आली की, कोल्हापूर जिल्ह्यात १६ मे पासून २३ मे २०२१ पर्यंत प्रशासनाच्या वतीने केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या बंद काळातील MIDC क्षेत्रातील ग्राहकांचा तोट्याचा किंवा नाहक भरावा लागणार विजेचा किमान आकार रद्द करुन या ग्राहकांना दिलासा द्यावा.