छत्रपती शिवरायांच्या ‘जगदंबा तलवारी’चा लागला शोध, या ठिकाणी आहे तलवार

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही ब्रिटनच्या राणीच्या संग्रहात असल्याची माहिती समोर आलीय. कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराजांनी १८७५ साली तत्कालीन ब्रिटीश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स याला एक नजराणा दिला होता. त्यात इतर अनेक वस्तूंसोबत एका तलवारीचाही समावेश होता. ही तलवार म्हणजे जगदंबा तलवारच असल्याचं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सिद्ध केंलय. 

  महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचा आदर्श. त्यांच्या बालपणीच्या, तरुणपणीच्या शौर्याच्या आणि हुशारीच्या कथा ऐकत इथला प्रत्येकजण लहानाचा मोठा झालेला. शिवरायांच्या चरित्रातील दोन महत्त्वाच्या तलवारी म्हणजे भवानी तलवार आणि जगदंबा तलवार. यातील जगदंबा तलवार कुठे आहे, असा प्रश्न कित्येक वर्षांपासून शिवप्रेमींना पडला होता. त्याचं उत्तर आता मिळालंय.

  छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही ब्रिटनच्या राणीच्या संग्रहात असल्याची माहिती समोर आलीय. कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराजांनी १८७५ साली तत्कालीन ब्रिटीश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स याला एक नजराणा दिला होता. त्यात इतर अनेक वस्तूंसोबत एका तलवारीचाही समावेश होता. ही तलवार म्हणजे जगदंबा तलवारच असल्याचं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सिद्ध केंलय.

  इंग्लंडमध्ये साऊथ केनस्टिंग गॉन नावाचं जगप्रसिद्ध संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे संचालक सी. प्युऱडॉन यांनी त्यांच्याकडं असणाऱ्या भारतीय शस्त्रांची एक यादीच जाहीर केलीय. त्याच एका तलवारीची माहिती देण्यात आलीय आणि त्या तलवारीचा फोटोदेखील प्रसिद्ध करण्यात आलाय. त्या तलवारीचे तपशील आणि फोटो यावरून ती जगदंबा तलवारच असल्याच सिद्ध होतंय, असं इंद्रजित सावंत यांचं म्हणणं आहे.

  असं आहे तलवारीचं वर्णन

  • मराठा तलवार
  • जुनी युरोपियन, एकपाती, सरळ तलवार
  • दोन बाजूंना दोन खोबणी
  • एका खोबणीत IHS असं तीनवेळा कोरलंय
  • तलवारीची मूठ लोखंडी असून त्याला गोलाकार परज आहे.
  • मुठीजवळ सोन्याच्या फुलांचं नक्षीकाम, मोठे हिरे आणि माणिक जडवलेले आहेत.
  • तलवार कोल्हापूरच्या छत्रपतींकडून गेलेली आहे आणि मराठ्यांचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज यांची निशाणी आहे.

  तलवारीच्या या वर्णनावरून ती जगदंबा तलवार असल्याचं निश्चित होत असून ती भारतात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत.