होय ! चक्क स्मशानभूमीतच निघाली मुलांची सहल

सहल म्हटले की मोठंमोठी ठिकाणे लक्षात येतात. नेहमी ही सहल बागबगीचा, संग्रहालय, वने, प्रदर्शन, गडकिल्ले, मंदिरे आदी ठिकाणी जातात. मात्र, अब्दुललाट (ता.शिरोळ) येथे लहान मुलांची सहल थेट स्मशानभूमीत निघाली.

    जयसिंगपूर : सहल म्हटले की मोठंमोठी ठिकाणे लक्षात येतात. नेहमी ही सहल बागबगीचा, संग्रहालय, वने, प्रदर्शन, गडकिल्ले, मंदिरे आदी ठिकाणी जातात. मात्र, अब्दुललाट (ता.शिरोळ) येथे लहान मुलांची सहल थेट स्मशानभूमीत निघाली. स्मशानभूमीतील मुलांनी धमाल केलीच. पण विज्ञानातील महत्त्वाच्या मूल्यांच्या आधारे भूत, आत्मा या मनावर रेखाटलेल्या संकल्पना जाणून घेतल्या. यानिमित्ताने हा अनुभव मुलांचे भविष्य समृद्ध करणारा ठरला आहे.

    अब्दुललाट येथे विद्योदय मुक्तांगण परिवार अनेक उपक्रम राबवते. विज्ञान शिक्षण संवाद, गंमत गल्ली शाळा असे अनेक उपक्रम मुलांसाठी राबवले. दरम्यान, मुलांच्या चर्चेतून भूत, आत्मा यांसारख्या गोष्टी पुढे आल्या. परंपरेने मनावर कोरलेल्या भूत, आत्म्याच्या कल्पना मुले सांगू लागली. भूत कसे दिसतात, तयार होतात त्यापासून कोणाच्या अंगात येतात. इथंपर्यंत मुले वर्णनात्मक सांगत होती. त्यामुळे मुलांच्या मनावरील चुकीच्या गोष्टी पुसून टाकणे गरजेचे होते. पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे या विज्ञानातील महत्त्वाच्या मूल्यांची ओळख मुलांना करून देण्यासाठी सहल निश्चित केली.

    मुलांना ठिकाणाचे नाव न सांगता स्मशानभूमीत सहल जाण्याचे ठरले. विद्योदय परिवाराचे विनायक माळी व त्यांच्या पत्नीने विविध उदाहरणे देत मुलांच्या अनेक गैरसमजुती दूर केल्या.