घरफाळ्याच्या तक्रारींसंदर्भात तात्काळ मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करा; राजेश क्षीरसागर यांच्या सूचना

    कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. घरफाळा दंड रक्कमेबाबतीतील शासन निर्णयात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिल्या. घरफाळ्याची प्रलंबित प्रकरणे, नगररचना विभागाचे कामकाज आदी विषयी कोल्हापूर महानगरपालिका येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकरी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, यावर्षी आलेल्या महापुराच्या पाण्यात बाधित झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. शहरातील पूरबाधितांचे पंचनामे करण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची असून, पंचनाम्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून पूरबाधित नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळवून द्या. शहरातील कोरोना व नवीन डेल्टा प्लस रुग्णांची सद्यस्थिती बाबत विचारणा केली. यासह लाखो रुपयांचा घरफाळा बुडवूनही डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्या सिद्धांत हॉस्पिटलवर कोणतीही कारवाई होत नाही. सन २०२१ च्या अधिसूचनेप्रमाणे डॉ. वाईकर यांच्या रुग्णालयावर दोन दिवसात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

    घरफाळ्यासंर्दभात नागरिकांवर लादण्यात आलेल्या अतिरिक्त दंडाची रक्कमे बाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे. महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याची आवश्यकता आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. नगररचना विभागाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, या विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत नगररचना विभागाने तात्काळ कामात सुधारणा करून लोकाभिमुक व्हावे, अशा सूचनाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या.

    यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी, पूरग्रस्त नागरिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, पंचनाम्याची पडताळणी सुरु आहे. सदर पडताळणी पूर्ण केल्यानंतर लवकरच शासनाकडे निधी साठी प्रस्ताव सादर करण्यात येईल. शहरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असून रोज सुमारे २५०० टेस्ट केल्या जातात त्यातही पॉझीटिव्ह रेट दीड ते दोन टक्के इतका आहे. यासह डेल्टा प्लस रुग्णांची संख्याही आवाक्यात आहे. घरफाळ्याच्या तक्रारींसदर्भात नागरिकांसाठी आठवड्यातील दोन दिवस ठरवून मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करू. या शिबिराद्वारे नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल.

    यासह दिलेल्या सुचनेनुसार नगररचना विभागाच्या कामकाजात सुधारणा होवून नागरिकांना नाहक त्रास होणार नाही, याची दक्षता घेवू, असे सांगितले. या बैठकीस शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उप-आयुक्त निखील मोरे, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियांता अजय साळुंखे, घरफाळा अधीक्षक विजय वनकुद्रे, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत आदी महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.