shahu maharaj and ajit pawar

मराठा आरक्षणावरुन(Maratha Reservation) राज्यात तापत असलेल्या वातावरणामुळे आजच्या अजित पवार(Ajit pawar) - शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj)भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

  कोल्हापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी आज सकाळी कोल्हापुरातील(Kolhapur) न्यू पॅलेसमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Chatrapati Shahu Maharaj)यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केली. खासदार संभाजीराजे यांनी १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी(Maratha Reservation) पुन्हा एल्गार पुकारण्याचे रणशिंग फुंकल्यानंतर त्यांची धार कमी करण्याच्या उद्देशाने आजची ही भेट आल्याचे जाणकारांनी मत व्यक्त केले.

  मराठा आरक्षणावरुन राज्यात तापत असलेल्या वातावरणामुळे आजच्या अजित पवार – शाहू महाराजांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. बैठक संपल्यावर छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे शाहू महाराज यांनी नमूद केले.

  सुमारे एक तास आम्ही आरक्षणाशिवाय इतर विषयांवर सुद्धा गप्पा गोष्टी केल्या असे सांगून मराठा आरक्षण मुद्द्यावर काय चर्चा झाली त्याबद्दलची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसार माध्यमांना सांगतीलच असे छत्रपती शाहू महाराज म्हणाले.
  राज्य सरकारने समाजासाठी जे चांगले करता येईल ते करावं असा सल्ला सुद्धा आपण दिल्याचे शाहू महाराज म्हणाले.

  मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.निकालाच्या प्रतीचे मराठीत भाषांतर करून तो निकाल समजून घेऊन जे शक्य असेल ते सर्व केलं पाहिजे.मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष असून यापुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही असा खुलासासुद्धा श्रीमंत शाहू महाराजांनी केला.

  मराठा समाज स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे असे सांगताना सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी तो करावा आणि कोर्टाचा अवमान होता कामा नये याची दखलसुद्धा घ्यावी असे शाहू महाराजांनी सूचित केले.

  केंद्र सरकारने जर आरक्षणाच्या बाबतीत लक्ष दिले आणि सरकारला यामध्ये रस असेल तर कायद्यात बदल करुन पुढचं पाऊल टाकता येईल हे आपण यापूर्वी सुद्धा सांगितल्याचे शाहू महाराज यांनी स्पष्ट केले.

  कायद्यात काय बसतं हे सांगायला मी कायदेपंडित नाही,असे सांगून मराठ्यांसाठी जास्तीत जास्त करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक असल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी बोलताना दिला. पण जर तुम्ही चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे म्हटले तर कसे आणून देणार अशी विचारणा सुद्धा शाहू महाराजांनी यावेळी केली.

  या बैठकीला माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, इंद्रजित सावंत,तसेच मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक उपस्थित होते..