Dispute between President Swabhimani, former MP Raju Shetty and police

कोल्हापूर : दिल्लीत शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आणि शेतकरी मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकार विरूध्द कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. यावेळी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने माजी खासदार राजू (Raju Shetty)शेट्टी यांच्या शर्टाची कॉलर पकडल्याने याठिकाणी गोंधळ झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळताना पोलिस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांचीही कॉलर धरून त्यांना आंदोलनाबाहेर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकर्ते अधिक संतप्त होवून पोलिसांच्या अंगावर धावून गेले.

दरम्यान, पोलिसांनी शेट्टींची माफी मागावी, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांचे काम केले आता शेतकरी प्रश्‍नांसाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची कॉलर धरू असे उत्तर राजू शेट्टींनी दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. जर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय वळण लागले तर आम्ही देशभरात आंदोलन तीव्र करू. माझ्यासोबत कोणी धक्काबुक्की केली यामुळे फरक पडत नाही. आमचा शेतकऱ्यांसाठी लढा सुरूच राहील. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह होतात तरी कोण? आज आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आम्ही सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपले लक्ष्य साध्य केले.

- राजू शेट्टी, अध्यक्ष स्वाभिमानी