‘ड्रोन’ आधुनिक तंत्रज्ञानाचा हवाई स्प्रे; शेतीसाठी किफायतशीर, वेळ व खर्चाची बचत

  वारणानगर : ‘ड्रोन’ आधुनिक तंत्रज्ञानाचा हवाई स्प्रे पंप शेतीसाठी किफायतशीर ठरत असून, याच्या वापराने मोठ्या प्रमाणात वेळ व खर्चाची बचत होईल, असे मत कोल्हापूर जिल्ह्यातील वेसरफ – पळसंबे ता. गगनबावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील सह. साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुनिल पाटील यानी व्यक्त केले आहे.

  शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो म्हणत असतो. आपल्या समस्या दुसऱ्यासमोर मांडताना दुसऱ्याने त्या सोडवल्या पाहिजे, असा दृष्टिकोन सर्वसामान्यांचा असतो. याचाच एक भाग म्हणून ड्रोनव्दारे औषध फवारणी हे तंत्रज्ञान उदयास आले. मागील ३-४ वर्षांपासून यावर प्रायोगिक तत्वावर चाचण्या झाल्या. त्यामध्ये सुधारणा झाल्या. येथून पुढेही त्यामध्ये अजून काही नावीन्यपूर्ण सुधारणा होतील. सध्या द्राक्षे, भाजीपाला सोयाबीन, भुईमूग, गहू, भात, ऊस, फळबाग सर्वच पिकासाठी रोग व किड नियंत्रणासाठी किटकनाशके, बुरशीनाशके, वृध्दीसप्रेरके सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक खते इत्यादी मजुरांच्या साह्याने हातपप / बॅटरी स्प्रे पंपाचा वापर केला जातो.

  या सर्व कामासाठी वेळेवर मजूर मिळणे गरजेचे असते. द्राक्ष बागेमध्ये रोग / किड नियंत्रण करणे अत्यंत अटीतटीची बाब असते. अर्ली छाटणीच्या काळातही १५ ते २० सप्टेंबरमध्ये पाऊस येत असतो. अशा स्थितीमध्ये बागेतून ट्रॅक्टर चालवणे अवघड होते व फवारणीची अडचण निर्माण होते. तसेच एक वर्षापुढील ऊसावर रोग व किड नियंत्रण करणेसाठी, यामधूनच ड्रोनव्दारे औषध फवारणीची संकल्पना पुढे आली. पारंपारिक पध्दतीने शेती करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञान शेतात वापरण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या नवीन तरुण शेतकऱ्यांना ड्रोन हे एक वरदानच ठरेल. केवळ काही मिनिटात एक एकर क्षेत्रावर फवारणी करणे शक्य असल्यामुळे, नवयुवकांना एक नवा व्यवसाय उपलब्ध झाला आहे, असे ऊस विकास अधिकारी सुनिल पाटील यानी सांगितले.

  ड्रोनची वैशिष्ट्ये 

  क्षमता – औषध साठवणी क्षमता – ५ ते १० लिटर –  ड्रोनची क्षमता वाढवण्यासाठी मोटर आणि प्रोपेलरची संख्या वाढवली जाते. तो एकदा चार्ज केल्यानंतर १५ मिनिटांपर्यंत फवारणी करता येते. एक एकरच्या क्षेत्रासाठी द्रावणाच्या प्रमाणानुसार ५ मिनिटांपर्यंत फवारणी होते. (फवारणी क्षेत्राची जी पी एस प्रणालीव्दारे मोजणी, ड्रम मध्ये औषध, पाणी भरणे,सेटींग करणे इ. वेळ सोडून) फवारणी कशाप्रकारे होते. ड्रोनमध्ये फवारणीचा सर्व कार्यक्रम साठवला जातो. रिमोट किंवा मोबाइलव्दारे सूचना देऊन ड्रोनचे नियंत्रण करता येते. जीपीएस प्रणालीव्दारे शेताचे चार कोपरे मार्क (खुना) करुन दिले जातात. त्याच्या आत ड्रोन फवारणी पूर्ण करते क्षेत्र मोठे असल्यास फवारणीचे द्रावण संपल्यावर ड्रोन परत जागेवर येते. ड्रोनमध्ये द्रावण भरुन दिल्यानंतर उर्वरीत फवारणी कोणतीही सूचना न देता पूर्ण करते. असे पुन्हा पुन्हा करता येते असे ऊस विकास अधिकारी सुनिल पाटील यानी सांगितले.

  ड्रोनव्दारे औषध फवारणीचे फायदे

  अचूक व समप्रमाणात फवारणी होते. मानवी हस्तक्षेप नसल्याने कीडनाशकांच्या विषारी पणाचे परिणाम शेतकऱ्यांवर होणार नाहीत . – पिकांच्या उंचीनुसार फवारणीसाठी आपोआप जूळवून घेतो. कमी वेळात फवारणी होत असल्याने वातावरणात बदल होत असतानाही त्वरीत फवारणी पूर्ण करता येते.द्रावण फवारणीचा दर आपल्या गरजेनुसार कमी जास्त करता येतो. एका चार्जीगमध्ये १५ मिनिटे चालते तेवढ्या वेळात तीन एकरपर्यंत फवारणी पूर्ण करता येते.

  – हात पंपासाठी लागणाऱ्या फवारणी द्रावण प्रमाणापेक्षा ड्रोन मार्फत फवारणीसाठी २५ % रोग / किडनाशक द्रावण कमी लागते. त्यामुळे खर्चात बचत होते पाच ते सात फुटापेक्षा जास्त ऊंच ऊस पिकामध्ये रोग व किड नियंत्रणासाठी फायदेशीर ठरते.

  उदा. पांढरा लोकरी मावा,तांबेरा इ. ड्रोन व्दारे किडनाशक फवारणी केलेनंतर ऊस पिकातील पांढरा लोकरी मावा तिसऱ्या दिवशी पूर्णपणे नियंत्रणात येतो . – सर्वसाधारणपणे हातपंपाव्दारे फवारणी करणेसाठी १२-१३ पंप (१५ लि.क्षमता) लागतात व दोन – तीन तास काम करावे लागते . व प्रती पंप रु. ५० प्रमाणे रु.६००-६५० इतका फवारणी खर्च प्रती एकर येतो. ड्रोनमार्फत प्रती एकर रु. ६०० हातपंपाव्दारे होणारी मजूरी खर्चाइतकीच मजूरी घेतली जाते. ड्रोनमार्फत एक एकर फवारणी करणेसाठी फक्त ५ ते १० मिनिट लागतात. त्यामुळे वेळेची बचत होते, असे सुनिल पाटील यानी सांगितले. तसेच सध्या याचा वापर वाळवा तालुक्यातील राजाराम बापू पाटील सह साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुरू झाला आहे, असे म्हटले आहे.