केंद्राच्या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांना पहिली उचल १६८० रुपयेच; राजू शेट्टींचा राज्यासह केंद्रावर हल्लाबोल

  जयसिंगपूर : केंद्र व राज्य सरकारने एफआरपीचे तीन तुकडे पाडण्याचे कारस्थान केले आहे. नीती आयोगावर जबाबदारी ढकलून केंद्र व राज्याने हात बाजूला केले आहेत. यामुळे जिल्ह्यासाठी पहिली उचल टनाला १६८०, तर जिल्ह्याबाहेर १३२० रुपये अशी मिळणार आहे. उर्वरित दोन हप्ते हंगाम संपल्यानंतर मिळणार आहेत. निव्वळ साखर कारखानदारांना वाचवण्यासाठी हा कुटील डाव असून या धोरणामुळे शेतकरी भिकेला लागणार आहे, अशी टीका स्वाभिमानीचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

  यावेळी शेट्टी म्हणाले, कृषिमूल्य आयोगाने ८७ टक्के नफ्याचा संदर्भ धरून यंदाची २९०० रुपये प्रतिटन एफआरपी जाहीर केली. १५५० रुपये प्रतिदन उसाचा उत्पादन खर्चगृहीत धरून ही एफआरपी काढली हेच चुकीचे आहे. एफआरपी जाहीर करून ती सुद्धा तीन टप्प्यात द्यावी, अशी शिफारस निती आयोग, कृषिमूल्य आयोगाने केली आहे. त्याला केंद्र व राज्य सरकार दोघांनीही होकार दर्शवला आहे. त्यानुसार पहिली उचल एफआरपीच्या ६० उचल ऊस तुटल्याच्या १४ दिवसात २० टक्के उचल दोन महिन्यानंतर तिसरी २० टक्के ही हंगाम संपल्यानंतर अथवा दुसरा हंगाम सुरू होण्याआधी द्यावी, अशी शिफारस केली.

  कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी उतारा १२ टक्के धरला तर २७०० ते २८०० रुपये एफआरपी बसणार त्यात ६० टक्केचा निकष
  लावला तर केवळ १६८० रुपये पहिली उचल मिळणार आहे. यातून शेतकऱ्यांना त्यांचा खर्च सुद्धा मिळणे कठीण आहे. त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे, ह्या निर्णयाची शासनकर्त्याना मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल असा घणाघात ही त्यांनी केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

  सर्वांची पळताभुई थोडी करू

  ऊस उत्पादक शेतकरी खूप जागरूक आहे. या धोरणांमुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट असून बड्या राजकीय पक्षांना याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत स्वाभिमानी गप्प राहाणार नाही. कायदेशीर लढणार असून सर्वांची पळताभुई थोडी करू, असा गर्भित इशाराही शेट्टी यांनी दिला.

  विरोध करण्यासाठी मिस्डकॉल मोहीम

  केंद्र- राज्याच्या तीन टप्यात एफआरपी देण्याला विरोध म्हणून १२ ते ३० सप्टेंबरपर्यंत स्वाभिमानी राज्यभर मिसकॉल मोहीम राबवणार आहे. ८४४८१८३७५१ या नंबरवर शेतकऱ्यांनी मिसकॉल देऊन सरकारचा कुटील डाव मोडून काढावा असे आवाहन स्वाभिमानी संघटनेतर्फे केले आहे.