शिरोळ तालुक्यातील वीस हजार हेक्टर पिकांची धुळदान; शेतकरी हवालदिल

    जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील नागरिकांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. २०१९ च्या महापुराचा अंदाज असल्याने नागरिकांनी तातडीने स्थलांतर होण्यास पसंती दिली. परंतु गावी परतल्यानंतर घरे व साहित्य अस्ताव्यस्त झाले होते. तालुक्यातील शेतीचे तब्बल सहाशे कोटींचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना यावर्षी पुन्हा अस्मानी संकटाचा सामना करावा लागला आहे.

    शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांना आलेल्या महापुराने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ४३ गावातील १६ हजार हेक्टरमधील म्हणजेच ४० हजार एकरमधील ऊसाला प्रचंड फटका बसला. यात खोडवा, अडसाली लागणीचा समावेश आहे. या महापूरामुळे तब्बल १६ लाख टन ऊस खराब झाला असून प्रति गुंठा एक टन सरासरी धरल्यास ३ हजार रूपये दराप्रमाणे तब्बल ४८० कोटीचा फटका बसला आहे. भुईमूगचे १५३५ हेक्टर तर सोयाबीनचे १२७२ हेक्टरवर नुकसान झाले आहे. सोयाबीन व भुईमूगला एकरी वीस ते पंचवीस हजार तर उसाला एकरी साठ हजार खर्च येतो.
    तालुक्यातील ४३ गावातील मोठे कृषी क्षेत्र पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतातूर आहे. तर सरकारकडून घोषित केलेली भरपाई अत्यंत तुटपुंजी असून, शेतकर्‍यांचे नुकसान भरून निघणार तर कसे असा सवाल उपस्थित होत आहे.

    तुटपुंज्या मदतीमुळे शेतकऱ्यांत असंतोष

    शासन निर्णयाप्रमाणे प्रति गुंठा १३५ रूपये म्हणजेच एकरी ५४०० रूपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. एकरी लाख रुपये नुकसान झाले असल्याने ही मदत तुटपुंजी ठरणार आहे. २०१९ साली आलेल्या महापूरात सरकारने १६ हजार २०० रूपये प्रतिएकर ऊसाला भरपाई दिली होती. मात्र, सध्या शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत मोठा असंतोष पसरला आहे.