नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : सतेज पाटील

सतेज पाटील यांनी मेघोली तलावाचा भराव वाहून गेलेल्या प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन संबंधित अधिकारी व गावकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

    गारगोटी : मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटल्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन देऊन या दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी सांगितले.

    भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील लघु पाटबंधारे तलाव फुटल्याची घटना बुधवारी (दि.1) रात्री उशिरा घडली. हा प्रकल्प फुटल्यामुळे अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे एका व्यक्तीचा व काही जनावरांचा मृत्यू झाला. तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालकमंत्री पाटील यांनी या घटनास्थळाला भेट देवून गावकऱ्यांशी संवाद साधला.

    तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, प्र. उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी अडसूळ, पदाधिकारी, सरपंच, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

    नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचे काम शासन करेल

    पालकमंत्री सतेज पाटील यांनी मेघोली तलावाचा भराव वाहून गेलेल्या प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन संबंधित अधिकारी व गावकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचे काम शासन करेल, असे सांगितले.