सध्याच्या लागू निर्बंधांना मुदतवाढ : जिल्हाधिकारी दौलत देसाई

  कोल्हापूर/दीपक घाटगे : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाच्या बैठकीमध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यासाठी स्तर-४ अंतर्गंत लागू केलेल्या निर्बंधांना पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा 11 ते 17 जून 2021 या सप्ताहातील सरासरी पॉझिटिव्हीटी रेट हा 10 टक्क्यांपेक्षा जास्त परंतु 20 टक्क्यांच्या आत आहे. ऑक्सिजन बेड्स व्यापल्याची टक्केवारी 60 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने कोल्हापूर जिल्हा निर्बंध स्तर-4 मध्ये अंतर्भूत होत आहे.

  कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायोजनेअंतर्गत साथरोग कायदा 1897, कलम 2 नुसार, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदीनुसार त्या-त्या जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापल्याच्या टक्केवारीनुसार एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले होते. त्या-त्या स्तरानुसार संबंधीत जिल्ह्यामध्ये निर्बंध लागु करणे अथवा सुट देण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.

  यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात स्तर-4 चे निर्बंध लागू असल्याने, विविध बाबी, हालचाली व आस्थापनांना 7 जून 2021 रोजी पासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

  साथरोग अधिनियम 1897 मधील कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील अधिकारांस अनुसरून, कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी देण्यात आलेल्या आदेशास पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

  पुढील कालावधीत निर्बंधाचे स्तर निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यपध्दती असेल :-

  1. राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग दर गुरुवारी वापरातील ऑक्सिजन बेडची टक्केवारी व कोविड पॉझीटीव्हीटी रेट जिल्हानिहाय जाहिर करेल. तदनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याबाबतचा निर्णय घेईल, त्या प्रमाणे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निर्बंधांची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत जाहीर करेल.

  2. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर नमुद केलेल्या मानकाप्रमाणे, आपल्या कार्यक्षेत्रातील विविध प्रशासकीय घटकांसाठी या मानकाप्रमाणे एकमत झाल्यानंतर राज्य स्तरीय ऑक्सिजन ट्रिगरच्या अधिन राहून व असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रामध्ये कोणत्या स्तरावरील निर्बंध लावले जाईल याचा निर्णय घेईल.

  3. निर्बंध पातळीवर काही बदल झाल्यास पुढील सोमवार पासून सुधारीत निर्बंध अंमलात येतील.

  आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.