रासायनिक सांडपाणी नदीत मिसळत असल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

    जयसिंगपूर : औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यावर आधीही पुष्कळदा मोर्चे, आंदोलने झाली आहेत. परंतु तात्पुरती मलमपट्टी करून नंतर दुर्लक्ष केले जात होते. याची अर्जुनवाडचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य विकास पाटील यांनी बुधवारी रासायनिक पाणी जाणाऱ्या ओढ्याची पाहणी केली. याप्रश्नी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि नदीकाठच्या गावातील सरपंचांना एकत्र करून जनआंदोलन उभारण्याचा इशारा विकास पाटील यांनी दिला आहे.
    उदगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे दूषित पाणी पुन्हा नदीपात्रात सोडले जात आहे. यापूर्वी ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाणी बंद करावे, असा आदेश दिला होता. अर्जुनवाड ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जेसीबीने पाईप फोडून हे पाणी बंद केले होते. परंतु, सहा महिन्यांपासून परत पाणी मिसळत असल्याने उदगाव, चिंचवाडसह अर्जुनवाडच्या शेतकऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागत आहेत. रात्रीच्या वेळेस हे रासायनिक पाणी थेट कृष्णेच्या पात्रात सोडले जात असल्याने नदी काठावरील अनेक गावातील लाखो ग्रामस्थांच्या आरोग्याचा व शेतीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
    जलशुद्धीकरण प्रकल्प देखावे बनले असून, पुन्हा एकदा याविरोधात आंदोलन उभारण्यासाठी शेतकरी एकवटत आहेत. अशा पद्धतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष न करता या भागातील हजारो ग्रामस्थ, शेतकरी लाखो ग्रामस्थांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे व  संबंधितांवर कारवाई करावी. अन्यथा तालुक्यातील बाधित शेतकरी, पदाधिकारी यांना घेऊन मोठे जनआंदोलन उभे करावे, अशी मागणी जोर धरत आहे.