सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खड्डयांचे डिपॉझिट माफ करा : किशोर घाटगे

    कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खड्डयांचे डिपॉझिट पूर्णपणे माफ करावे, गणेश आगमन व विसर्जन होणाऱ्या ठिकाणचे युद्धपातळीवर त्याच्यावर करावे, गंगावेश, शिवाजी पूल व गंगावेश इराणी खण मार्ग सुस्थितीत करावा, घरगुती गणेश मूर्ती विसर्जन कुंडाची ठिकाणे निश्चित करावीत, तरुण मंडळे व संस्था सहकार्य म्हणून विसर्जन कुंडे करणार असतील तर त्या गणेश मूर्ती नेण्यासाठी वाहन व्यवस्था करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे किशोर घाटगे, सुशील भांदीगिरे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने केली.

    शहरात दरवर्षी गणेश उत्सव सोहळा साजरा केला जातो. तसेच गणेश विसर्जन करण्यात येते. यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. विसर्जन कुंडाजवळ निर्माल्य कुंडाची व्यवस्था करावी त्याचा उठाव करावा, इराणी खण येथे तरुण मंडळाच्या गणेश मुर्ती विसर्जित होतात, त्या ठिकाणी त्वरित निर्गत व पुरेशी विद्युत व्यवस्था व्हावी, अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी उपयुक्तांनी सदरचा मागण्या अतिशय मौलिक असून त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात रियाज बागवान, सनी अतिग्रे, राकेश पोवार, सागर कलघटगी, अनिकेत जाधव, शुभम बागल, रईस बागवान आदींचा समावेश होता.