उपमहाराष्ट्र केसरी व मुरगूडचे माजी नगराध्यक्ष पैलवान प्रकाश चौगले यांंचे निधन

जुन्या पिढीतील नामवंत मल्ल उपमहाराष्ट्र केसरी आणि मुरगूडचे माजी नगराध्यक्ष पैलवान प्रकाश सखाराम चौगले (Prakash Chougale) (वय ६२ ) यांचे आज राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले.

    मुरगूड : जुन्या पिढीतील नामवंत मल्ल उपमहाराष्ट्र केसरी आणि मुरगूडचे माजी नगराध्यक्ष पैलवान प्रकाश सखाराम चौगले (Prakash Chougale) (वय ६२ ) यांचे आज राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. मुरगूडच्या सामाजिक, राजकीय व क्रीडाक्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. ‘नाना’ या नावाने ते परिचित होते.

    विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी कोल्हापूरच्या काळाईमाम तालमीत कुस्तीचे धडे गिरविले. मितभाषी, उत्तम शरीरसंपदा आणि अत्यंत शांत स्वभावामुळे राज्यभर त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. आपल्या क्रीडागुणांच्या बळावर त्यांनी उपमहाराष्ट्र केसरी पदापर्यंत झेप घेतली. कुस्तीतून निवृत्त झाल्यावरही त्यांनी अनेक वर्षे काळाईमाम तालमीत वस्ताद म्हणून काम केले. त्यांच्या अनेक मल्ल शिष्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला. कबड्डी खेळाच्या विकासातही त्यांनी सातत्याने पाठबळ दिले.

    कुस्ती क्षेत्रातून निवृत्त झाल्यावर ते मुरगूडच्या राजकारणात सक्रीय झाले. दिवंगत खासदार लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी त्यांना मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट दिले. पहिल्याच निवडणूकीत त्यांनी विजय मिळविला. स्व. लोकनेते मंडलिक साहेबाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने त्यांनी प्रकाश चौगले यांना मुरगूडचे नगराध्यक्ष केले. क्रीडाक्षेत्रा बरोबरच त्यांनी नगराध्यक्ष म्हणून शहराच्या विकासात मोठे योगदान दिले. चौगले गल्ली तालीम मंडळाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते.

    स्व. खासदार मंडलिक यांच्या बरोबरीने त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत काम केले. त्यांच्या पत्नी संगीता प्रकाश चौगले मुरगूडच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहीत मुलगी, भाऊ रघुनाथ चौगले, चुलते डॉ. बाजीराव चौगले, पुतणे पैलवान श्रीकांत चौगले, शशीकांत चौगले, रंगराव चौगले, बाळकृष्ण चौगले व रणजीत चौगले असा मोठा परिवार आहे. शोकाकूल वातावरणात मुरगूडच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.